भोसरीत दोन बालकांचा भटक्या कुत्र्यांनी तोडला लचका, गंभीर जखमी

0
321

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत आहे. भोसरी भागातील लांडगे वस्ती येथे भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात श्रीजित काकडे आणि गणेश गायकवाड हे दोन मुलं गंभिर जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी ही मुल भोसरी परिसरात खेळत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्यांने जीवघेणा हल्ला केला आहे. भटक्या कुत्र्याने श्रीजीत काकडे आणि गणेश गायकवाड या दोन मुलांच्या चेहऱ्याला चावा घेतला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली असून, या दुर्घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. महापालिका प्रशासनाकडे पाणी पुरवठा खालोखाल भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत, मात्र त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्याची मुख्य जबाबदारी ही कायदा व नियमांप्रमाणे त्या-त्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९६० या कायद्याच्या कलम ३८ (१) व (२) अन्वये असलेल्या अधिकारान्वये सरकारने प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २००१ हे नियम लागू केले. त्यानुसार, कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, रेबीज रुग्णांना बरे करणे, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती नेमणे, अशी जबाबदारी आहे. मात्र, जवळपास सर्वच महापालिकांमध्ये याप्रश्नी प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे, भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे.