भोसरीतील लाचखोरावर कारवाई

0
9

दि . ६ ( पीसीबी )पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग-२ येथे कार्यरत सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३४) आणि त्यांच्या ओळखीच्या खाजगी इसम श्यामलाल असोकन (वय ३४) यांना ₹२५,००० लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात. त्यांनी दि. ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता.

काम करून देण्यासाठी नरवडे यांनी सुरुवातीला ₹३५,००० लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने दि. २ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली. ४ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान नरवडे यांनी तडजोड करत ₹२५,००० लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार ५ जून रोजी, सापळा रचण्यात आला. यामध्ये तक्रारदाराकडून नरवडे यांनी खाजगी इसम श्यामलाल असोकन याला लाच रक्कम स्वीकारण्यास सांगितले. श्यामलालने ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.

दोघांविरोधात भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचा एजंट लाचेची मागणी करत असेल, तर त्वरित खालील माध्यमांतून संपर्क साधावा:

📞 दूरध्वनी: ०२०-२६१२२१३४ / २६१३२८०२ / २६०५०४२३

📱 व्हॉट्सअ‍ॅप: ९९३०९९७७००

📧 ई-मेल: [email protected]

🌐 वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in

📲 ऑनलाइन अ‍ॅप/तक्रार: www.acbmaharashtra.net.in