भोसरीतील रेकॉर्डब्रेक सभेने गव्हाणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

0
19

दि. १३ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकितील शरद पवार यांची अक्षरशः रेकॉर्डब्रेक गर्दीची प्रचारसभा बुधवारी (दि.१३) भोसरी गावजत्रा मैदानावर झाली. नेत्यांची तडाखेबंद भाषणे आणि अलोट गर्दीमुळे महाविकास आघाडितील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या घटकपक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांची बाजू भक्कम झाली. महायुतीमधील भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भोसरी मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखदत होता म्हणून हे जनमत एकवटल्याचे दर्शन झाले. लाखाच्या लिडने जिंकणार अशा वल्गना कऱणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना अक्षरशः धडकी भरविणाऱी अत्यंत उत्स्फुर्त गर्दी या प्रचार सभेला झाल्याने गव्हाणे यांच्या विजयावर आताच जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. आमदार लांडगे यांच्या विरोधात गव्हाणे अशी सरळ लढत आहे. आमदार लांडगे यांनी पहिल्यापासून विकास कामांची जंत्री वाचत प्रचार केला. दुसरीकडे गव्हाणे यांनी दहा वर्षांच्या कारकिर्दित कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार कुठे कुठे झाला याचा पाढा वाचला. ७० लाखाचा पादचारी पूल सात कोटींना, भामा आसखेड जॅकवेल प्रकऱणात ३० कोटींची लूट, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार, संतपीठ नावाखाली खासगी संस्थेच्या सीबीएसई स्कूलची दुकानदारी, अर्बन स्ट्रीट फूटपाथ, मोशी कचरा डेपो, शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रियेचा ठेका आदी कंत्राटांत किती मलिदा खाल्ला याचा लोखाजोखाच गव्हाणे यांनी मांडला.
भाजपच्या आमदारांनी शहर कसे वाटून घेतले त्याचे नमुनेदार उदाहऱण सर्वांना भावले. माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी सर्व प्रचाराची सूत्रे हातात घेतल्याने त्यांच्या संदिग्ध भूमिकेवर पडदा पडला. साहेबांच्या बरोबरीने दादांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि भाजपतील नाराज माजी नगरसेवकांचे पाठबळ हे अजित गव्हाणे यांच्यासाठी एकवटल्याने त्यांचे पारडे जड झाले. शिवसेनेच्या रणरागिनी सुलभा उबाळे आणि भाजपमधून नव्याने पक्षात आलेले रवि लांडगे यांनीही भ्रष्टाचारावर जोरदार प्रहार करत भोसरीसह आजवरच्या सर्व प्रचारसभा गाजवल्या. भाजपच्या नाराज नगरसेवकांची तसेच अजितदादांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांची मोठी फौज गव्हाणे यांच्या मागे ठामपणे उभी राहिल्याचे चित्र सभा मंचकावर दिसले. खुद्द शरद पवार यांनी भाषणात भाजप सरकारच्या योजनांचे वाभाडे काढले.

आमदारांचा पाय घसरल्याने दिशा बदलली –
सर्वांनी मिळून आरोपांच्या फैरी झाडल्या आणि कठोर टीकेचे प्रहार केल्याने आमदार लांडगे यांचा पाय घसरला. दिघी येथील प्रचारसभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतः, मी खूप सहन केलेय, काय करायचे ते प्रहार माझ्यावर करा, कार्यकर्त्यांवर नको, राजकारण हा माझा पेशा नाही, मूळचा महेश लांडगे पुन्हा आणायला लावू नका असे म्हणत इशारा दिला. २० तारखेनंतर माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत धमाकवले. तिथेच गाडी फसली आणि संपूर्ण प्रचाराची दिशा बदलली. आमदारांच्या त्या संतप्त भाषणाची क्लिप मतदारसंघात प्रचंड व्हायरल झाली आणि गावकी भावकीपासून सगळे वारे फिरले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आमदारांचे नाव न घेता बकासुराची उपमा देत केलेले भाषणसुध्दा अत्यंत प्रभावी ठरले, ते तुफान व्हायरल झाले. मतदारसंघातील ही कुती सुरवातीला आमदार लांडगे चितपट करतील असे चित्र होते, आता ते अगदी पालटलेले दिसले. शरद पवार यांच्यासारखा वस्ताद आपले शागिर्द अजित गव्हाणे यांच्यासाठी भोसरीच्या आखाड्यात उतरल्याने रंगत वाढली. आता प्रचार टिपेला पोहचला असून अटितटिची लढाई आहे. भोसरीत मॅन, मनी, मसल पॉवरची चर्चा वेगात आहे. मताला ३००० रुपये भाव फुटल्याची वदंता आहे. एका रात्रीतून राजकारण बदलू शकते. आता पुढचे चार-पाच दिवसांत आणखी काय खेळ्या, डावपेच होणार त्यावर २३ चा निकाल अवलंबून आहे. एक मात्र नक्की, आज मितीला मैदानात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरल्याने अजित गव्हाणे काकणभर सरस आहेत. शरद पवार यांच्या एकाच प्रचार सभेचा हा सर्वात मोठा चमत्कार आहे.