भोसरीतील बालनगरी प्रकल्प गुंडाळला, 15 एकराचा भूखंड ‘एमआयडीसी’च्या घशात.

0
299

पिंपरी,दि.१५ (पीसीबी) – भोसरीत उभारण्यात येणाऱ्या बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर गुंडाळण्यात आला असून या प्रकल्पाऐवजी केंद्र सरकारच्या ललीत कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी 15 एकराची जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने बालनगरी प्रकल्पावर केलेला 20 कोटी खर्च पाण्यात गेला आहे. 20 कोटींच्या बांधकामासह 15 एकराचा भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) च्या ताब्यात देण्यास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.  

भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉक अंतर्गत मोकळ्या जागेतील भुखंड हा ताबा पावतीद्वारे सन 1984 मध्ये महापालिकेकडे एमआयडीसीकडून हस्तांतरीत झाला आहे. त्याचे क्षेत्रफळ 60 हजार 378 चौरस मीटर (सुमारे 15 एकर) आहे. या भुखंडावर आरक्षण विकासाच्या अनुषंगाने बालनगरी प्रकल्प करण्याचे ठरले होते. या प्रकल्पात मुख्यत: लहान मुलांना बालशिक्षण हा विषय डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्रातील सामान्य ज्ञान देणार्‍या सेवा व संस्थांची माहिती देण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले. या ठिकाणी लहान मुलांना शिक्षणासाठी अग्निशमन, रूग्णालय, बँकींग, पोलीस ठाणे, टपाल कार्यालय अशा प्रकारच्या सेवांची माहिती देणे, मनोरंजनासाठी अ‍ॅम्पीथियटर आदी कक्ष निर्माण करण्यात आले.  

बालनगरी प्रकल्पातील टप्पा एकचे काम 25 मे 2018 रोजी पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सुमारे 5 हजार चौरस मीटर इतके बांधकाम झाले आहे. त्यावर सुमारे 20 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पुढील टप्प्यात बांधकाम करण्यापूर्वी हा प्रकल्प चालविण्याकरिता एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आला. त्याला कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही. या कालावधीत राज्यातील विविध शहरांमध्ये स्थित असलेल्या चित्रकला महाविद्यालयांकडून तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या प्रसिद्ध संस्थेकडून राज्यातील कला विकासासाठी केंद्र सरकारच्या ललीत कला अकादमीच्या विभागिय केंद्रासाठी ही जागा देण्याबाबत विचारणा करण्यात आली.

त्या अनुषंगाने ललीत कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी राज्यातील विविध प्रतिनिधींसमवेत जुलै महिन्यात या प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पाची जागा त्यावरील बांधकामासह ललीत कला अकादमीच्या विभागीय केंद्राच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असल्यान ही जागा महापालिका आणि राज्य सरकारमार्फत त्यावरील बांधकामासह ललीत कला अकादमीस मिळावी, अशी विनंती केली. या प्रकल्पाची जमीन ही एमआयडीसीकडून विनामुल्य हस्तांतरीत झालेली असल्याने हस्तांतरीत करण्यापूर्वी एमआयडीसी तसेच राज्य सरकारची मान्यता घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी आतापर्यंत सुमारे 5 हजार चौरस मीटर इतके बांधकाम महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. हे बांधकाम वापरण्यायोग्य असून भविष्यातील बांधकाम ललीत कला अकादमी मार्फत करण्यात येणार आहे. 15 एकराचा भूखंड अस्तित्वातील 20 कोटी रुपयांचे बांधकामासह एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.