भोसरीतील प्रभाग क्रमांक पाचच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ‘तुरा’

0
586

बहुमजली वाहनतळाचे उद्या अजितदादांच्या हस्ते भूमीपूजन; अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रयत्नांना यश

भोसरी, दि. २ (पीसीबी)– येथील प्रभाग क्रमांक पाच, गवळीनगरने गेल्या काही वर्षांत अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली दैदिप्यमान वाटचाल सुरू ठेवली असून या प्रभागाच्या मानपेचात आणखी एक मानाचा ‘तुरा’ रोवला जाणार आहे. भोसरी आळंदी रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सुटावा आणि पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बाजारपेठेच्या धर्तीवर भोसरी – आळंदी रस्त्यावरील बाजारपेठेचा विकास व्हावा या उद्देशाने प्रयत्न करणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. उद्या शुक्रवार (दि. ३ मे ) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बहुमजली वाहनतळाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

भोसरी येथील क्रमांक पाच, गवळीनगरमधील नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने प्रयत्न करणाऱ्या अजितभाऊ गव्हाणे यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे भोसरी परिसरातील सर्वाधिक वेगाने विकासीत होणार हा प्रभाग ठरला आहे. आतापर्यंत या प्रभागामध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून सखुबाई गबाजी गवळी उद्यान, खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने उभारलेले स्केटींग ग्राऊंड, फिटनेसची आवड तरुणांमध्ये व्हावी यासाठी ए.पी. फिटनेस जीम, शंकर गवळी बॅडमिंटन हॉल, धोंडिबा फुगे क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खेळाचे मैदान, राधानगरी उद्यान, गंगोत्री पार्क उद्यान यासारखी विकासकामे झाली आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता प्रभागामध्ये बहुमजली वाहनतळ उभारले जात आहे.
वाहनतळाबाबत माहिती देताना अजितभाऊ म्हणाले, या प्रभागामध्ये भोसरी आळंदी रस्त्यावर शहरातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये भोसरीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. सातत्याने वाढत असलेल्या बाजारपेठेमुळे वाहनतळाचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. हा प्रश्न लक्षात येताच अजितभाऊंनी तातडीने लक्ष घालत सखुबाई गबाजी गवळी उद्यानाजवळ हे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तीन मजली असलेल्या वाहनतळामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार असून दीडशे दुचाकी आणि 75 चारचाकी वाहनांना उभे करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी तीन स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून लिफ्टची सुविधाही देण्यात येणार आहे. भोसरी परिसरातील हे पहिले अत्याधुनिक वाहनतळ ठरणार असून या वाहनतळ उभारणीसाठी माजी नगरसेविका अनुराधाताई गोफणे, माजी नगरसेवक सागर गवळी आणि माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही अजितभाऊ गव्हाणे यांनी आवर्जुन सांगितले.
लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांना अत्याधुनिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. या वाहनतळामुळे बाजारपेठेतील पार्किंगचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. तसेच येत्या काळात आळंदी-भोसरी रस्त्यावरील बाजारपेठेचा विकास हा पुण्यातील लक्ष्मीरोडच्या धर्तीवर करणार आहे. उद्या शुक्रवार सकाळी 9:00 वाजता या वाहनतळाचे भूमीपूजन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रभागातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अजितभाऊ गव्हाणे यांनी केले आहे.