भोर येथे केमिकल मिश्रित ताडी पिल्याने तरुणाचा मृत्यू; महिलांनी आक्रमक होत केली दुकानाची तोडफोड

0
5

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील अंगसुळे गावात धक्कादायक घटना घडली आहे. केमिकल मिश्रित ताडी प्यायल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विजय शेडगे (वय 24 वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांनी आक्रमक होत गावातील अवैध ताडी व दारू विक्री करणाऱ्या दुकानांची जोरदार तोडफोड केली आहे.

गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार, अंगसुळे गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध ताडी आणि दारू विक्रीचा धंदा सुरू आहे. याबाबत अनेकवेळा पोलिस प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. असा आरोप गावकऱ्यांनी केला. परिणामी, गावातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. आतापर्यंत चार ते पाच तरुणांनी जीव गमावला आहे.

गावातील तरुणांच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. महिलांनी संतप्त होत ताडी तयार करणाऱ्या दुकानातील बॅलर रस्त्यावर फेकुन दिले. तसेच दुकानाची तोडफोड करण्यात आली.

या घटनेनंतर अंगसुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलिस घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी अवैध व्यवसाय बंद होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.