दि.२९(पीसीबी)-नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. न्यायालयाने अशोक खरात याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावत तपास यंत्रणेला मोठा दिलासा दिला आहे.
पूर्वीची कोठडी संपल्यानंतर आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्ष, तपास यंत्रणा आणि बचाव पक्ष यांच्यात जोरदार युक्तिवाद रंगला. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विशेष तपास पथकाचे अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून ‘कोडवर्ड’चा वापर करण्यात आल्याचा संशय आहे आणि त्याचा उलगडा करण्यासाठी समक्ष चौकशी अत्यंत गरजेची आहे. तसेच, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा मुद्दाही त्यांनी ठामपणे मांडला.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनीही खरात हा संपूर्ण रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ असल्याचा गंभीर आरोप करत, त्याच्या मोबाईलमधील डेटा, जंगम मालमत्ता आणि इतर कनेक्शनचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. डमी नावे वापरून संवेदनशील माहिती लपवण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पीडित महिलांच्या वतीने वकील एम. वाय. काळे यांनीही न्यायालयात ठाम भूमिका घेत, गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणेला अधिक वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील सचिन भाटे यांनी या सर्व आरोपांना जोरदार विरोध करत, तपास यंत्रणेकडे आधीपासूनच पुरावे उपलब्ध असतानाही वाढीव कोठडीची मागणी केली जात असल्याचा दावा केला. मोबाईलची क्लोन कॉपी उपलब्ध असल्याने पुढील कोठडीची गरज नसल्याचे त्यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अखेर अशोक खरात याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत खरातविरोधात तब्बल १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. तपास यंत्रणेनुसार, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.








































