भेसळयुक्त दूध पिणे ठरले धोकादायक … १६ जणांचा तडफडून मृत्यू!

0
2

दि.२२ (पीसीबी) – भेसळयुक्त अन्नपदार्थांचा धोका किती भीषण असू शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय आंध्रप्रदेशात आला आहे. गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दूध पिल्यामुळे तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला असून, आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागांत फेब्रुवारी महिन्यापासून भेसळयुक्त दूध विकले जात होते. सुरुवातीला २२ फेब्रुवारीपासून नागरिकांना मळमळ, उलटी, तीव्र पोटदुखी, लघवी बंद होणे आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारखी गंभीर लक्षणे दिसू लागली.

या घटनांमुळे संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने सखोल चौकशी केली असता, नरसापूरम येथील एका डेअरीमधून हे दूध पुरवले जात असल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे, या दुधात ‘एथिलीन ग्लायकॉल’ हा अत्यंत विषारी रसायन मिसळण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

या विषारी दुधामुळे २० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना डायलॅसिस आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, काही जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

ही डेअरी सुमारे १०० पेक्षा जास्त कुटुंबांना दूध पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. दूध सेवन केल्यानंतर काही तासांतच नागरिकांची प्रकृती बिघडू लागल्याने या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.एकूणच, नफ्यासाठी केलेली भेसळ किती जीवघेणी ठरू शकते, याचे हे भीषण उदाहरण असून, अन्नसुरक्षेबाबत अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.