भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला १५ कोटी रुपये कर्ज दिले, एक रुपया परत केला नाही

0
298

नाशिक, दि. २६ (पीसीबी) – येवला बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र दराडे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

येवला बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी येवल्यात सभा घेतली. त्यात त्यांनी माझ्यावर आरोप केले. शेतकरी विकास पॅनल आणि समर्थ पॅनल यामध्ये लढत आहे. त्या पॅनल व प्रचाराऐवजी भुजबळ यांनी जिल्हा बँक दराडे बंधुंनी बुडवली असे विधान केले.

आमदार दराडे म्हणाले, मी त्यांना सांगू इच्छीतो की, महाराज आम्ही जिल्हा बँक बुडवली नाही. आम्ही आर्मस्ट्राँग कंपनीसाठी भुजबळ यांना १५ कोटी रुपये कर्ज दिले होते. आजपर्यंत तुम्ही एक रुपया देखील परतफेड केलेली नाही. ४० कोटींची तुमच्यावर थकबाकी आहे. अशा तुमच्यासारख्या बलाढ्य लोकांनी जिल्हा बँकेला बुडवले आहे. गोरगरीब, शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही.

ते म्हणाले, तुम्ही मला म्हाडाचा विभागीय अध्यक्ष गेले. त्यात काहीही उपकार केले नाही. मी दहा, पंधरा वर्षे तुमच्याबरोबर होतो. इतर लबाड व लुच्चे लोकांसारखे कधी एक रुपया तुमचा मी वापरला नाही. आज तुमच्याकडे विक्री करणारे लोक आले आहेत. मी शिवसेनेचा नाही, असे तुम्ही म्हणता. माझे तुम्हाला जाहीर आव्हान आहे, मी ओरीजनल शिवसेनेचा आहे.

उद्धव ठाकरे गटाचा मी आहे. माझा मुलगा अत्यंत कमी वयात जिल्हाप्रमुख आहे. मी येवल्याचा भूमीपुत्र आहे. बाजार समितीत गेल्या पंधरा वर्षात पाय तरी दिला का?. आता म्हणताहेत मी विकास करीन. आम्ही काही दुधखुळे नाही. आमच्या शेपटावर पाय देऊ नका. आम्ही देखील काही लुळेखुळे नाही. उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही.