भुजबळ, मुंडे, आत्राम मंत्री होणार; दिलीप वळसे पाटील यांचा पत्ता कापणार

0
51

मुंबई, दि. 03 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता जवळपास दहा दिवस उलटले आहे. मात्र तरीही राज्यात अजून सरकार स्थापन झाले नाही. विधानसभेत महायुतीने मोठे यश मिळवले.मात्र महायुतीकडून अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. येत्या 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

यामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असणार? मुख्यमंत्र्याची लॉटरी कुणाला लागणार?, याबाबत बोललं जातंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही संभाव्य मंत्र्यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासमोर 12 संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी देखील जाहीर केली असल्याची माहिती आहे.

कालच ( 2 डिसेंबर) प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.या बैठकीला अजित पवार ,कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीला पार्थ पवार यांनी देखील हजेरी लावली होती. या बैठकीत मंत्रिपदा बाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?
एकीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये काही पदांवरून नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीने मात्र आपली स्पष्ट भूमिका घेतल्याचं यातून दिसून येतंय. अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी जो चेहरा असेल, त्याला आपला पाठिंबा असल्याच देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादीत स्वतः अजित पवार यांच्याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे,अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम यांचा समावेश असेल. सर्वात जेष्ठ दिलीप वळसे पाटील यांचा पत्ता गूल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटातील ही काही संभाव्य मंत्र्यांची यादी आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या नावांवर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचा विचार केल्यास राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर या तिघांसोबत एकूण 32 आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचं बोललं जातंय. सर्वाधिक मंत्रिपदे ही भाजपच्या पदरात पडण्याची शक्यताही वर्तवली जातेय. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे नेमकी किती मंत्रीपदं जाणार, हे पाहणं देखील उत्सुकाचं ठरणार आहे. तत्पूर्वी अजित पवार गटातील या संभाव्य मंत्र्यांची नावे चर्चेत आली आहे. येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आहे.