भीषण अपघातात माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन

0
86

दि . २७ ( पीसीबी ) – बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपुलावर भीषण अपघातात दुःखद निधन झाले. देशमुख यांच्या वाहनाने बेलकुंड येथील उड्डाणपुलावरून जाताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहनाने सुरक्षा कठडा तोडत चार वेळा पलटी घेतली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर तातडीने त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली अर्पण करत आपली भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनाही ही दुर्घटनेची माहिती नांदेड येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमादरम्यान मिळाली. त्यांनी तात्काळ आपले सर्व कार्यक्रम रद्द करत लातूरकडे रवाना होऊन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.

या दुर्घटनेमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त केली जात असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.