भीक मागून “स्वाभिमानी” चुकवणार सदाभाऊंची उधारी

0
194

सांगली, 18 जून (पीसीबी) : मागच्या दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्याकडे रस्त्यात आडवून एका हॉटेल मालकाने जूनी उधारी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 2014 सालापासून उधारी दिली नसल्याने संतप्त हॉटेल मालकाने सदाभाऊंवर थेट आरोप केले. यानंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत त्या हॉटेल मालकावरही आरोप केले. या सगळ्या प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक हा आमचा जूना कार्यकर्ता असल्याचे शेट्टी म्हणाले. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि भागवत जाधव यांनी आम्ही भीक मागून उभारी देणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

सांगोला तालुक्यातील मांजरी येथील मामाभाचे हॉटेल मालक अशोक शिणगारे यांनी गुरूवारी (दि. 16) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवून 2014 सालची उधारी मागितली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी ‘मी याची कसलीही उधारी केलेली नाही आणि अशोक शिणगारे याला मी ओळखत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला पाठवून हा स्टंट केला आहे, असा आरोप केला होता. याच दरम्यान सदाभाऊ खोत यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांनी मात्र अशोक शिणगारे हा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला सक्रिय कार्यकर्ता होता. तो जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने काही आंदोलनातही सहभाग घेतला होता. आता तो आमच्या संघटनेत नाही. मात्र, पूर्वी होता. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्याने आमच्या उमेदवाराला सहकार्य केले होते असे ही शेट्टी म्हणाले.