पिंपरी,दि०९ (पीसीबी) – बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानाचे शटर उचकटून त्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळला. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास डांगे चौक येथे उघडकीस आली आहे.
डांगे चौक येथे फेड बँक आहे. या बँकेच्या शेजारी ॲड. जवळ यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे शटर रात्रीच्या वेळी दोघांनी उचकटले. दुकानात प्रवेश करून त्यांच्या शेजारी असलेल्या फेड बँकेत प्रवेश करण्यासाठी भिंत फोडण्याचा दोघांनी प्रयत्न केला.
दरम्यान, हा प्रकार एका कामगाराच्या निदर्शनास आला. कामगाराने आपल्या मालकाला याबाबत माहिती दिली. मालकाने तात्काळ डायल 112 वर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पथक डांगे चौकात दाखल झाले. पोलीस आल्याचे लक्षात येताच चोरटे पत्र्यावरून पळून जाऊ लागले. मात्र गस्तीवरील पथकातील एका पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकास पकडले.
यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
            
		











































