मुंबई, दि. १८ (पीसीबी) : भारतीय जनता पक्ष आता लॉन्ड्री पक्ष झालेला आहे. कथित भ्रष्ट माणसांना धुवून काढण्याचं काम भाजपची लॉन्ड्री करत आहे. ज्या नारायण राणेंवर भाजपने इतके आरोप केले, तेच राणे भाजपमध्ये गेल्यावर पवित्र झाले. ठाकरे सरकारमधील तत्कालिन मंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूप्रकरणात आरोप झाले. त्या प्रकरणात राठोडांचाच हात आहे, असा आरोप भाजप नेत्यांनी केला. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर होत्या. त्याच चित्रा वाघ सध्या राठोडांविरोधात चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीका करताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांनी नक्कल केली.
शिवसेना ठाकरे गटाने नेते भास्कर जाधव आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबीच्या कारवाईच्या निषेधार्थ भव्य मोर्चा पार पडला. या मोर्चाला संबोधित करताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांचा समाचार घेतला. नारायण राणे, नितेश-निलेश राणे, चित्रा वाघ यांच्यावर जाधवांनी जोरदार फटकेबाजी केली. “नारायण राणे देशाचे मंत्री पण गल्लीत त्यांना कुणी विचारत नाही, उद्धव ठाकरे तर राणेंचं कधी नावही घेत नाही. पण ठाकरेंची सभा पार पडली रे पडली, की राणेंनी प्रेस घेतलीच म्हणून समजा, एवढी कोंडबीचोराची वाईट अवस्था…”, अशा शब्दात भास्कर जाधवांनी राणेंची खिल्ली उडवली तर राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी चित्रा वाघ यांना घेरलं.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये संजय राठोड मंत्री होते. एका मुलीच्या मृत्यू प्रकरणात तेच दोषी आहेत, अशी आरोपांची राळ भाजपने उडवली. पण आता राठोड गद्दार गटात गेले की तिकडचे लोक शब्द काढत नाही. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तर राठोडांवर आधी किती टीका केली. त्या उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करायच्या. पण आता काय झालंय? आता शब्द काढत नाही, अशी टीका करताना भास्कररावांनी चित्रा वाघ यांची मिमिक्री केली.