चिपळूण, दि. १९ (पीसीबी) – उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारासची घटना?
भास्कर जाधव हे काल वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर संध्याकाळी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, रात्रीच्या सुमारास त्यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घराच्या अंगणात स्टम्प, दगड आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल असण्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या या वस्तूंच्या आधारे हा खरंच हल्ला करण्याचा प्रयत्न होता की आणखीन काही? या दिशेने स्थानिक पोलीस तपास करत आहेत.











































