– आता शिवसेनेचे खासदरही म्हणू लागले, शिंदेंच्या बरोबर चला
मुंबई, दि. ६ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील विधिमंडळात धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली आहे. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तापालटापूर्वी महाविकास आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्याची रणनीती आखली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडासाठी भाजपकडून पुरवण्यात आलेली रसद पाहता शिवसेनेची भूमिका कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, आता राहुल शेवाळे यांनी पक्षाविरोधात जाणारा विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदारही फुटतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसे घडल्यास शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचा एकनाथ शिंदे गटाच्या दाव्याला आणखी बळकटी मिळेल. त्यामुळे संपूर्ण शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या न्यायालयीन लढाईत एकनाथ शिंदे गटाला फायदा मिळू शकतो.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का, हे पाहावे लागेल. कालच मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राहुल शेवाळे यांनी केली होती.










































