दि.१४(पीसीबी)-इतिहासात भारत-इजिप्त संबंध मुख्यतः लाल समुद्रावरील सागरी व्यापारापुरते मर्यादित मानले जात होते. मात्र आता एका महत्त्वपूर्ण शोधामुळे या नात्याचा आवाका अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट झाले आहे.स्वित्झर्लंड आणि फ्रान्समधील संशोधकांनी इजिप्तमधील प्रसिद्ध व्हॅली ऑफ द किंग्ज येथील थडग्यांवर कोरलेले सुमारे २,००० वर्षांपूर्वीचे तमिळ-ब्राह्मी शिलालेख शोधून काढले आहेत.
या शिलालेखांमध्ये ‘सिकाई कोर्रन’ नावाच्या तमिळ व्यापाऱ्याचा उल्लेख आढळतो. यावरून भारतीय व्यापारी केवळ किनारी बंदरांपुरते मर्यादित नसून इजिप्तच्या अंतर्गत ऐतिहासिक भागांपर्यंत प्रवास करत होते, असे सूचित होते.
संशोधकांच्या मते, या शिलालेखांमुळे प्राचीन काळात भारत-इजिप्त संबंध केवळ व्यापारापुरते नव्हते, तर सांस्कृतिक देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणावर होत होती. व्यापारी पवित्र स्थळे, भव्य वास्तू आणि ऐतिहासिक स्मारके पाहण्यासाठी अंतर्भागात प्रवास करत आणि त्यांनी तमिळ, संस्कृत व प्राकृत भाषांमध्ये नोंदी करून ठेवल्या.
‘सिकाई कोर्रन’ कोण?
स्विस विद्वान इन्गो स्ट्रॉच आणि फ्रेंच संशोधक शार्लोट श्मिट यांनी या शिलालेखांचा अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार, सुमारे २,००० वर्षांपूर्वी ‘सिकाई कोर्रन’ नावाचा तमिळ व्यापारी इजिप्तमधील फिरऔन राजांच्या थडग्यांना भेट देऊन गेला आणि त्याने सहा थडग्यांपैकी पाच ठिकाणी आठ वेगवेगळ्या ठिकाणी आपले नाव कोरले.
व्हॅली ऑफ द किंग्जसारख्या अंतर्गत भागात आढळलेले हे शिलालेख सूचित करतात की भारतीय व्यापारी इजिप्तमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असावेत आणि त्यांनी व्यापारासोबतच तेथील ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी लांब प्रवास केले असावेत.
विविध भारतीय भाषांचा ठसा
एकूण ३० शिलालेख नोंदवण्यात आले असून त्यापैकी २० तमिळ भाषेत आहेत, तर उर्वरित संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्टी भाषांमध्ये आहेत. या भाषिक विविधतेवरून रोमन काळात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर-पश्चिम भारतासह विविध प्रदेशांतील व्यापारी इजिप्तमध्ये येत असल्याचे सूचित होते.
एका संस्कृत शिलालेखात पश्चिम भारतातील ‘क्षहरात’ राजवंशाच्या दूताचा उल्लेख आहे, जो इ.स. पहिल्या शतकात येथे आला होता.
दोन दिशांनी व्यापाराचे संकेत
तमिळ भाषेत ‘सिकाई’ म्हणजे मुकुट किंवा शिखा, तर ‘कोर्रन’ म्हणजे नेता किंवा राजा. एका शिलालेखात ‘सिकाई कोर्रन-वरा कंत’ असा उल्लेख असून त्याचा अर्थ “तो आला आणि त्याने पाहिले” असा होतो. शिलालेखाची शैली त्या काळातील ग्रीक लेखनासारखी असल्याने हा व्यापारी ग्रीक भाषा जाणत असावा, असेही संशोधकांचे मत आहे.
लॉझान विद्यापीठाचे प्राध्यापक इन्गो स्ट्रॉच यांनी सांगितले की, यापूर्वी इजिप्तमध्ये तमिळ व्यापाऱ्यांचे पुरावे फक्त किनारी व्यापार बंदरांपुरते मर्यादित होते; मात्र या नव्या शोधामुळे भारतीय व्यापाऱ्यांचा प्रभाव इजिप्तच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.








































