भारतीय संस्कृतीच्या संवर्धानातूनच जगाचे कल्याण- पद्मश्री गिरीश प्रभुणे

0
385

– रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – विजयादशमीचा उत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव असून अधर्मावर धर्माचा विजय आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन असून अनादी काळापासून संपूर्ण जगाची मार्गदर्शक आहे. तक्षशिला, नालंदा सारख्या विद्यापीठातून देण्यात येणारे शिक्षण, भारतीय शिक्षण पद्धती, आपल्या राष्ट्रातील एकत्रित कुटुंब पद्धती, विविध भाषा , प्रांत ,पंथ ‘वसुधैव कुटुंबकम’ चा संदेश देतात या भारतीय संस्कृतीच्या संवर्धनातच संपूर्ण जगाचे हित आहे. परकीय आक्रमणे, ब्रिटिश मँकेलेने थोपलेल्या शिक्षण पद्धती मुळे भारतीय समाज विस्मृतीत गेला होता आता पुन्हा भारताला परम वैभव प्राप्त करून देण्याकरिता समाजातील विषमता, लालसा, जातीयवाद नष्ट करून राष्ट्र हिताचा विचार करणारी पिढी निर्माण करावी लागेल याच हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या ९७ वर्षांपासून समर्पित भावनेने कार्य करीत असल्याचे प्रतिपादन पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् चे संस्थापक पद्मश्री पुरस्कार प्राप्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी केले ते पिंपरी चिंचवड शहरातील संभाजी नगर भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयदशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

जाधववाडी येथील रामायण मैदानात संपन्न झालेल्या उत्सवात व्यासपीठावर ग्लोबल टॅलेंट आंतरराष्ट्रीय शाळेचे संस्थापक डॉ.ललित कुमार धोका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देहू गट कार्यवाह सचिन ढोबळे, संभाजीनगर नगर कार्यवाह निशांत बोरसे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले यावेळी स्वयंसेवकांनी शारीरिक, घोष, पद्य प्रात्यक्षिके सादर केली यावेळी पूर्ण गणवेशातील संघ स्वयंसेवकांचे शिस्तबध्द शारीरिक कार्यक्रम, प्रात्यक्षिके, घोष वादन बघून नागरिक भारावून गेले होते. गिरीश प्रभुणे यांनी विविध उदाहरणे देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाचे विविध क्षेत्रातील कार्यकर्ते समरस समाज निर्मिती साठी करीत असलेल्या सेवा कार्याची माहिती दिली. प्रमुख अतिथी डॉ.ललित कुमार धोका यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निःस्वार्थ कार्याची प्रशंसा करून राष्ट्रहितासाठी कटिबद्ध असलेल्या संघ कार्यकर्त्यांचे सर्वच क्षेत्रांतील योगदान अभिमानास्पद असल्याचे सांगितले.उत्सवाला परिसरातील स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.