भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे

0
570

चिंचवडगाव, दि. २५ (पीसीबी) – “भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी चिंचवड येथे उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले.निमित्त होते ज्येष्ठ साहित्यिक, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे लिखित व हिंदुस्तान प्रकाशन संस्था प्रकाशित ‘परिसांचा संग’ या पुस्तक विक्रीतून जमा झालेला निधी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला मदतनिधी म्हणून सुपूर्त करण्याच्या सोहळ्याचे.

या सोहळ्यात हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे, साप्ताहिक विवेकचे कार्यकारी संपादक रवी गोळे, पुस्तक विभाग प्रमुख शितल खोत, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्षा डाॅ. शकुंतला बन्सल, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, संचालक सदस्य अशोक पारखी, आसाराम कसबे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या प्रधानाचार्या पुनम गुजर, मुख्याध्यापक नटराज जगताप, वासंती तिकोणे, अश्विनी बाविस्कर व अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे म्हणाले, भारतीय संविधानामधील समतेचे खरे तत्व याठिकाणी जपले जात आहे.संविधानातील मूल्यांचा अर्थ रोज नव्याने उलगडत आहे. सामाजिक समरसतेचे कार्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणेंना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून जी गुणी माणसे भेटली त्यांचा परिचय या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविता आला याचा मनस्वी आनंद आहे.साप्ताहिक विवेकचे कार्यकारी संपादक रवि गोळे यांनी पुस्तक निर्मिती व प्रकाशन सोहळा आणि वाचकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हा प्रवास उलगडून सांगितला. या निमित्ताने समाजासाठी जगणार्‍या अनेक कार्यकर्त्यांचा परिसस्पर्श वाचकांनाही होवू शकला हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे त्यांनी नमूद केले.

पुस्तक विभाग प्रमुख शितल खोत यांनी या पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली,तसेच या पुस्तक विक्रीतून जमा झालेल्या निधीमधील काही रक्कम( सदतीस हजार रुपये) पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला देताना वाचकांचा आलेला सकारात्मक प्रतिसादाचे अनुभवसुद्धा सांगितले.पुस्तक विक्रीतून जमा झालेल्या निधीचा धनादेश हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणेंकडे सुपूर्त केला.

या आर्थिक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, समरसतेचे कार्य करत असताना जीवनात भेटलेल्या असंख्य व्यक्तींचे कार्य खूप मोठे आहे पण समरसतेच्या दृष्टीतून मला त्यांचा जाणवलेला नवा पैलू,जणू एक कवडसा उलगडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातून केला आहे. साप्ताहिक विवेक,हिंदुस्तान प्रकाशन संस्था पाठीशी उभे राहिल्याने समाजातील सर्व स्तरापर्यंत हे काम जावू शकले याबद्दल त्यांनी हिंदुस्तान प्रकाशन व साप्ताहिक विवेकचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या पुस्तक विभाग प्रमुख शितल खोत यांनी केले.तर आभार क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या उपाध्यक्षा शकुंतला बन्सल यांनी मानले.क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संचालक सदस्य आसाराम कसबे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्तवन गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.