भारतीय विद्यार्थिनीच्या अपघातावर अमेरिकन पोलीस हसत म्हणाला, व्हिडीओ व्हायरल

0
663

विदेश, दि. १५ (पीसीबी) – अमेरिकेत आठ महिन्यांपूर्वी झालेल्या एका जुन्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची भारत सरकारनं तात्काळ दखल घेतली असून अपघातानंतरच्या घटनाक्रमावर तीव्र आक्षेप घेतला आहे. अमेरिका सरकारनंही तात्काळ प्रतिसाद देत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जान्हवी कांडुला या भारतीय तरुणीच्या अपघाती मृत्यूची हा घटना आहे. यात जान्हवीचा जागीच मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलीस तिची खिल्ली उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जान्हवी कांडुला कोण होती याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण होती जान्हवी कांडुला?

जान्हवी कांडुला मूळची आंध्र प्रदेशची असून अमेरिकेतील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेली होती. २३ वर्षीय जान्हवी युनिव्हर्सिटीच्या साउथ लेक युनियन कॅम्पसमध्ये वास्तव्यास होती. २०२१ साली ती स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत बेंगळुरूहून अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. याच वर्षी पदवी तिच्या हातात पडणार होती. मात्र, हे सगळं तिच्या नशिबी नव्हतं. वर्षाच्या सुरुवातीलाच, जानेवारी महिन्यात एका भरधाव कारनं दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूमुळं जान्हवीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरणं कठीण जात असतानाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विक्षिप्तपणाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळं त्यांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. ‘एवढ्या दुर्दैवी घटनेनंतर कुणी असं कसं वागू शकतं,’ असा प्रश्न जान्हवीच्या आजोबांनी केला आहे.

कसा झाला मृत्यू?

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी केविन डेव्ह हा त्याच्या कारनं चालला होता आणि अचानक रस्ता ओलांडताना जान्हवीला त्याच्या कारची धडक बसली. अपघाताच्या क्षणी कारचा वेग ११९ किमी इतका होता. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेमुळं जान्वही १०० फूट अंतरावर जाऊन आदळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

व्हिडिओमध्ये अपघातानंतरच संवाद आहे. त्यात सिएटल पोलिस ऑफिसर्स गिल्डचे उपाध्यक्ष डॅनियल आपल्या ज्युनियर कर्मचाऱ्याला म्हणतात की ‘ती मेलीय.’ कॉमन मॅन होती असं ते पुढं म्हणतात. त्यावर त्याचा ज्युनियर हसून म्हणतो, ‘खरं आहे, फक्त ११ हजार डॉलर्स देतील. अशीही ती फक्त २६ वर्षांची होती आणि तिचं आयुष्य फारसं काही महत्त्वाचं नव्हतं.’ या व्हायरल व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.