“भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली!” – विनय पत्राळे

0
100

पिंपरी,दि. १ ( पीसीबी ) “अखंड भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली होय!” असे विचार भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांनी ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण येथे मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी व्यक्त केले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिन अभिवादन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून विनय पत्राळे बोलत होते. सरदार पटेलांच्या जीवनचरित्राचे संशोधक पंकज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, उद्योजक डॉ. मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चौधरी, गुजर समाज अध्यक्ष अजय गुजर, बहिणाबाई मंगळागौर ग्रुप अध्यक्ष विजया जंगले, लेवा पाटीदार मित्रमंडळ अध्यक्ष भागवत झोपे, नितीन बोंडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

विनय पत्राळे पुढे म्हणाले की, “भारताचे अनेक तुकडे पाकिस्तानात आहेत, अशी कल्पनाही आज आपण करू शकत नाही. ज्या अभिमानाने आपण भारताचा नकाशा पाहतो, त्याचे संपूर्ण श्रेय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे आहे. व्यक्तिगत सुख – दु:ख बाजूला ठेवून त्यांनी नेहमीच जीवनात राष्ट्रकर्तव्याला प्राधान्य दिले. काँग्रेसच्या संपूर्ण कमिटीने पटेल यांचे नाव सुचविले असताना केवळ महात्मा गांधी यांनी पंडित नेहरू यांच्या नावाची शिफारस केल्यावर त्यांच्या मताचा आदर करीत त्यांनी स्वतः माघार घेत नेहरू यांना नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळे अनुशासन, शिस्त यांचे प्रतीक म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे. तरीही त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला नाही. त्यांच्या निधनानंतर बराच काळ संसदेत त्यांचे तैलचित्र लावण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नव्हते. वास्तविक सरदार पटेलांच्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे जम्मू काश्मीर भारतात विलीन झाले होते; परंतु दुर्दैवाने पंडित नेहरू यांनी तो प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करून खूप मोठी चूक केली. कणखर भूमिका घेणाऱ्या इंदिराजी गांधी यांचेही योगदान आपल्याला विसरता येणार नाही. कणखरपणा दाखवून लवकरच पाकव्याप्त भूभाग भारतात येईल. अनेक प्रकारची भिन्नता असूनही सर्व भारतीय एक आहोत हेच आपण सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त दाखवून दिले पाहिजे!”

पंकज पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “सरदार पटेल यांनी ब्रिटिशांचे अनेक मानसन्मान नाकारले होते; परंतु समस्त जनतेने त्यांना आदराने ‘सरदार’ ही उपाधी बहाल केली होती. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी सर्वांना सोबत घेऊन लढा दिला. सुमारे ५६५ संस्थानांचे प्रेमाने विलिनीकरण करताना त्यांनी क्वचितच बळाचा वापर केला. त्यांच्या नेतृत्वाला संधी मिळाली असती तर वेगळा भारत घडला असता!” असे मत व्यक्त केले.

दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्मिता चौधरी यांनी स्वागतगीत तसेच देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. विलास भोकरे यांनी तबलासाथ केली. बहिणाबाई मंगळागौर समूहाच्या महिलांनी सामूहिक नृत्याच्या माध्यमातून गणेशवंदना सादर केली. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून, “पिंपरी – चिंचवड हे भारताचे लघुरूप आहे. या नगरीत भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून पंकज पाटील वीस वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सरदार पटेलांच्या विचारांचा जागर करीत आहेत!” अशी माहिती दिली.

माजी नगरसेवक नामदेव ढाके यांनी संयोजन केले. शुभम ढाके, दीपक चौधरी, कैलास रोटे, भूषण पाटील, सचिन वाणी, महेश बोरोले, महेश पाटील, मनोज पाटील, योगेश महाजन, कुणाल इंगळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. भरत बारी यांनी सूत्रसंचालन केले. सारंग चौधरी यांनी आभार मानले.