भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार

0
57

दि. १० ऑगस्ट (पीसीबी) – गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी या आरोपांचा गंभीर परिणाम अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला होता. दरम्यान, आता हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा एकदा भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत पुन्हा मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, ते नेमका कोणता खुलासा करणार याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या या पोस्टनंतर उद्योग विश्वातही मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च अदाणी समूहात घोटाळे सुरू असल्याचा केला होता आरोप
दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी २०२३ रोजी अदाणी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल जाहीर केला होता. त्यानंतर अदाणी समूहातील कंपन्यांचे समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू झाली होती. एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास समूहाच्या बाजारमूल्याचे पतन झाले होतं.

उद्योगपती गौतम अदाणी यांच्या मालकीच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी हिंडेनबर्ग रिसर्चने १०६ पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. अदाणी समूहातील कंपन्यांनी भांडवली बाजारात आपल्या समभागांचे भाव फुगवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला होता. तसेच अदाणी समूहाने बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही हिंडेनबर्गने केला होता. कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने समभागांचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता.