नवी दिल्ली, दि. १ : जगभरातील कोट्यवधी लोक आपला देश सोडून परदेशात नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थायिक होतात. यातील अनेकजण पैसे कमावून आपल्या मायदेशातील कुटुंबियांना पाठवतात. परदेशात पैसे कमाविण्यात भारतीय अव्वल स्थानावर आहेत. एकेकाळी आखाती देशातून भारताला सर्वाधिक रेमिटन्स (परदेशी पैशांचा स्रोत) मिळत होते. मात्र, आता त्यात बदल झाला असून अमेरिका आणि ब्रिटनमधून येणारा पैसा वाढला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असल्याचं रिझर्व बँकेनं आपल्या ताज्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. दरम्यान, भारतात अमेरिकेतून येणारा पैसा अचानक कसा वाढला? यामागची नेमकी कारणं काय? हे जाणून घेऊ…
भारतात येणारा पैसा अचानक कसा वाढला?
रेमिटन्स हा परकीय चलन मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. केवळ आखाती देशांमधूनच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांसारख्या प्रगत देशांमधूनही भारतात मोठ्या प्रमाणावर रेमिटन्स येत आहेत. २०१०-११ मध्ये इतर देशातून भारताला ५५.६ अब्ज डॉलर्स रेमिटन्स मिळाले होते. २०२३-२४ मध्ये ते दुप्पट होऊन ११८.७ अब्ज डॉलर्स झाले आहेत. या महिन्यातील आरबीआयच्या मासिक बुलेटिननुसार, अमेरिका हा भारतातील रेमिटन्सचा सर्वोच्च स्रोत होता. २०२१-२१ मध्ये भारताला अमेरिकेकडून २३.४ टक्के रेमिटन्स मिळाले होते. २०२३-२४ मध्ये ते वाढून २७.७ टक्के इतके झाले.
परदेशात काम करणारे स्थलांतरित कामगार तेथे पैसा कमावून आपल्या मायदेशातील कुटुंबियांना पाठवतात. परंतु, या स्थलांतरितांना मोठ्या आर्थिक संकटासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्थलांतराच्या खर्चामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढतो. कामाच्या ठिकाणी गैरवर्तन आणि नोकरीवर असताना त्यांना परदेशी लोकांच्या नापसंतीचा सामना करावा लागतो. परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. एका आकडेवारीनुसार, सुमारे एक कोटी ८० लाख भारतीय परदेशात राहतात. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १.३ टक्के आहे. यातील बहुतेक भारतीय संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स आणि सौदी अरेबियामध्ये राहतात.
या बदलामागचं नेमकं कारण काय?
आरबीआयची आकडेवारी पाहता, यापूर्वी आखाती राष्ट्रांमधून भारताला सर्वाधिक रेमिटन्स मिळत होते. मात्र, आता त्यात बदल झाला असून विकसित देशांमधून भारतात येणाऱ्या रेमिटन्सचं प्रमाण वाढलं आहे. यामागचं कारण म्हणजे, परदेशात स्थलांतरित होऊन नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण वाढलं आहे. युएईमधील भारतीय स्थलांतरित कामगार प्रामुख्याने बांधकाम, आरोग्यसेवा, हॉटेल आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रात नोकऱ्या करतात. तर अमेरिकेत स्थलांतरित झालेले बहुतेक भारतीय चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहेत. ज्यामध्ये वित्त, औषध आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.