मुंबई, दि. २५ (पीसीबी) : भारतात बॉम्बस्फोट करून हाहा:कार माजवून देईल, मुंबईत एकापाठोपाठ एक असे धमकीचे फोन येत होते. यामागे खरा सुत्रधार कोण? याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. अवघ्या पोलीस यंत्रणेची झोप उडविणाऱ्या तसेच अशाप्रकारे धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देईल, अशी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय वर्षे 25) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे. रणजीत कुमारने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. गुन्हे शाखेने तपास केल्याप्रमाणे सहानीने हैद्राबादमधून कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. सहानी मुंबईत पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेने सुरू केले. अखेर मोबाइल लोकेशनच्या मदतीने सहानीला दक्षिण मुंबईतील चर्नीरोड परिसरातून अटक करण्यात आली.
‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’ व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल
सहानीने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला ‘बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है’ असे सांगितले.या फोन कॉलनंतर तक्रारदार, जो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याने मुंबई पोलिसांना माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 506(2) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.