भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी सात बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20) रात्री निगडी येथील अंकुश चौक साईनाथ नगर मध्ये काळभोर चाळ येथे करण्यात आली.
रॉकी सामोर बरुआ (वय 28), जयधन अमीरोन बरुआ (वय 28), अंकुर सुसेन बरुआ (वय 26), रातुल शिल्फोन बरुआ (वय 28), राणा नंदन बरुआ (वय 25, सर्व रा. बांगलादेश) अशी अटक केलेल्या नागरिकांची नावे आहेत. त्यांच्यासह साईनाथ सर (रा. चंदन नगर, पुणे), जिकू दास उर्फ जॉय चौधरी (रा. चंदन नगर, पुणे आणि मडगाव, गोवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी हे मूळचे बांगलादेश येथील आहेत. ते वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले. याबाबत पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार दहशतवाद विरोधी शाखेने पाच जणांना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी सात जणांवर परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.