भारतात कुठेही फिरण्याची ऑफर देत साडेतीन लाखांची फसवणूक

0
6

भोसरी, दि. २६ (पीसीबी) : पाच वर्षात 35 दिवस भारतात कुठेही फिरण्याची ऑफर देत सात जणांची तीन लाख 59 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चार सप्टेंबर रोजी ग्रँड इमिरेट्स प्रा ली टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मोशी येथील शाखेत तसेच चऱ्होली येथे घडली.

किरण रामराव बालुरे (वय 32, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य दत्तात्रय ठाणगे (वय 23, रा. बोपखेल), संतोष किसन वाघमोडे (वय 32), अनुराग प्रदीप नाईक (रा. दिघी), बिझनेस पार्टनर श्रीधर सुरेश खुडे (वय 31, रा. दिघी), रिलेशनशिप मॅनेजर मयूर दत्तात्रय ठाणगे (वय 25), महेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि इतर सहा लोकांना पाच वर्षात 35 दिवस संपूर्ण भारतात कुठेही फिरण्याची ऑफर दिली. त्यानंतर फिर्यादी आणि इतर सहा लोकांकडून विश्वासाने तीन लाख 59 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कुठेही न फिरवता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.