भारतातल्या “या” राज्यातील विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांनी घातली बंदी; कारण…

0
376

विदेश,दि.२७(पीसीबी) – ऑस्ट्रेलियातल्या विद्यापीठांनी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरचा समावेश आहे. व्हिसा फ्रॉडची प्रकरणं वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हिक्टोरिया या ठिकाणी असलेली फेडरेशन युनिव्हर्सिटी आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाने व्हिसा फ्रॉडसंबंधीची माहिती दिली आहे. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार भारतातून येणाऱ्या प्रत्येक चार विद्यार्थ्यांपैकी एकाचा व्हिसा अर्ज हा फ्रॉड, बनावट असतो. वेस्टर्न सिडनी विद्यापीठ आणि फेडरशेन विद्यापीठाने याच अहवालानंतर भारतातील सहा राज्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. या सहा राज्यांमधून जर व्हिसाचे अर्ज आले तर त्यांचा विचार होऊ नये असे निर्देश या दोन्ही विद्यापीठांनी दिले आहेत. १९ मे रोजी जारी केलेल्या एका पत्रात या विद्यापीठांनी हे म्हटलं आहे बनवाट व्हिसा प्रकरणं समोर येत आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना व्हिसा देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाची बाब ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसीय ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधीच या दोन्ही विद्यापीठांनी भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.ऑस्ट्रेलियामधल्या इतरही काही विद्यापीठांनी भारतातील काही राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ प्रवेशावर बंदी घातली आहे. कोवेन विद्यापीठ, टॉरेंस विद्यापीठ आणि साऊदर्न क्रॉस या विद्यापीठांनीही अशाच प्रकारे बंदी घातली आहे.