दि. १९ : भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्य ओडिशामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. ओडिशातील देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या ठिकाणी सोन्याचे साठे आढळले आहेत. तसेच मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध येथे सोन्याचे साठे शोधण्याचे काम सुरु आहेत. मार्च 2025 मध्ये खाण मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत याबाबक माहिती दिली होती, या खाणींचा भारताला मोठा फायदा होणार आहे.
ओडिशातील सोन्याच्या साठ्यांमधून किती सोनं मिळणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र भूगर्भीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार या भागात 10 ते 20 मेट्रिक टन सोने असू शकते. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. मात्र हा आकडा भारत आयात करत असलेल्या सोन्यापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी भारताने सुमारे 700-800 मेट्रिक टन सोनं आयात केलं होतं.
भारतात सोन्याचे साठे खूप मर्यादिती आहेत. 2020 पर्यंत देशात दरवर्षी फक्त 1.6 टन सोन्याचे उत्पादन होत होते. आता ओडिशामध्ये सापडलेले सोन्याचे साठी भारताच्या सोन्याच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणारे नसले तरी, यामुळे भारतातील देशांतर्गत सोन्याचे उत्पादन वाढणार आहे.
ओडिशा सरकार, ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) आणि GSI या सोन्याचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देवगडमधील पहिल्या सोन्याच्या खाणीच्या ब्लॉकचा लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या महसूलाला फायदा होणार आहे.
ओडिशात सापडलेल्या सोन्याच्या साठ्यामुळे प्रादेशिक विकासाला गती मिळणार आहे. पायाभूत सुविधा, खाणकाम, वाहतूक, स्थानिक सेवा यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओडिशातील खनिज निर्यातीला चालना मिळणार आहे. ओडिशात आधीच भारतातील क्रोमाईटचे 96 टक्के, बॉक्साईटचे 52 टक्के आणि लोहखनिजाचे 33 टक्के साठे आहेत. आता सोनं सापडल्याने ओडिशा खनिजांच्या बाबतीत आणखी समृद्ध बनले आहे.