भारताचा रशिया होणार, विरोधकांना संपवलं जाणार; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीवर घणाघात

0
34

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं यश आलं आहे. तर विरोधकांचा या निवडणुकीत अक्षरश: धुव्वा उडाला आहे. विरोधकांनी आपल्या पराभवामागे ईव्हीएम मशीन हे कारणं सांगितलं आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. देशात विरोधकांना संपवलं जाणार, असा दावाच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

“आज फक्त पराभूत उमेदवार नाही तर आम्हीही बैठकीत उपस्थित होतो. सगळ्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे जिकडे बालेकिल्ले आहेत तिथे पराभव होऊ शकतो? भारताचा रशिया होणार आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पूतीन यांनी त्यांच्या विरोधकांना संपवलं. तसचं इथे होऊ शकतं. ईव्हीएमच्या विरोधात आपण लढलो पाहिजे. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आपण पाहिलं. वि. पी. सिंग यांनीही आंदोलन केलं आणि मग बदल घडला”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“शरद पवार यांनी जयप्रकाश नारायण सारखी भूमिका घेतली पाहिजे आणि देशात हा बदल घडला पाहिजे. या ईव्हीएम विरोधात आपण आवाज उठवला पाहीजे. मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. ईव्हीएम नको आहे. देश संकाटात आहे. लोकशाही जगली पाहिजे. आज संविधान दिवस आहे आणि आपण तो वाचवला पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

खासदार अमर काळे यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “ज्या पद्धतीचा निकाल लागला तो सगळ्यात चुकीचा होता. आम्ही आमच्या मतदारसंघात काय झालं हे आम्ही शरद पवार यांना सांगितलं आहे. ईव्हीएमच्या विरोधाचा सूर आम्ही पवार साहेबांच्या चर्चेत व्यक्त केलं आहे. सर्व पक्षांनी EVM विरोधात एकत्र आले पाहिजे. मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता आम्ही हारलो. पण जेव्हा सरकार विरोधात लोक असताना अशी लाट येऊ कशी शकते? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. हा जो निकाल आहे तो लोकांचा नाही हा आरोप आम्ही लावतो आहे. मला लोकसभेत चांगला प्रतिसाद मिळाला पण आता का नाही? हा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला आहे”, खासदार अमर काळे म्हणाले.

यावेळी शरद पवार गटाचे काटोल विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार सलील देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “आम्ही एकनिष्ठ राहिलो. आमच्या मतदारसंघात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण आम्हाला निवडणुकीत यश मिळालं नाही. आम्हाला पराभव सहन करावा लागला. पण आमच्या मतदारसंघात याबाबत आश्चर्य वाटत आहे. सर्व सामन्यांना याबाबत आश्चर्य वाटत आहे. तुतारी या ठीकाणी ट्रम्पेट देता हे चुकीचं आहे”, असं सलील देशमुख म्हणाले.

“नागरीकांमध्ये असंतोष होता. मग हा निकाल कसा आला? आमच्या मतदारसंघात सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. सगळ्या प्रभागात बदल हवा होता हे वातावरण होतं. हा निकाल संशयास्पद आहे. आमच्या भागात आम्हाला मत नाही हे होऊ शकत नाही. आम्ही आणि पक्ष न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत”, अशी भूमिका सलील देशमुख यांनी मांडली.

“जे निकाल आले आहेत ते चुकीचे आहेत. आमच्या भागात आम्ही मागे आहोत हे कसं घडू शकते? अशी लाट कशीकाय आली? हा प्रकास संशयास्पद आहे. माझी मतं हे समोरच्या व्यक्तीला कशी मिळाली? आम्ही 20 वर्षापासून काम करत आहोत. मग आम्हाला का या गोष्टीला सामोरं जावं लागतंय?”, असा सवाल माजी आमदार सुनील भुसारा यांनी केला.