भारतविरोधी कारवाया करणाऱ्या आयएसआय एजंट मुल्ला बहौरची हत्या ?

0
305

विदेश,दि.१२(पीसीबी) – पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी व्यक्तीच्या हत्येची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आयएसआय एजंट मुल्ला बहौर उर्फ ​​होर्मुज उर्फ ​​महाद उर्फ ​​अब्दुल लतीफ याची बलुचिस्तानच्या केच भागात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची बातमी सर्व ट्विटर हँडलवर येत आहे. कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून नंतर त्यांना आयएसआयच्या हवाली करणाऱ्यांमध्ये मुल्ला बहौरचा हात होता असे सांगितले जाते. कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप करत पाकिस्तानने त्यांना तुरुंगात डांबले आहे.

कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत –
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. तेथून कुलभूषणच्या फाशीला स्थगिती देण्यात आली. सध्याही कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. पाकिस्तानमध्ये भारतविरोधी घटकांना सातत्याने मारले जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कराचीमध्ये कैसर फारुख नावाच्या दहशतवाद्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सप्टेंबरमध्ये, लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा हात अबू कासिम याला पीओकेच्या रावळकोटमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले होते.

खलिस्तान कमांडो फोर्सचा दहशतवादी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याशिवाय हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी बशीर मीर उर्फ ​​इम्तियाज आलम आणि जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री यांचाही पाकिस्तानात खात्मा झाला. कंदहार विमान अपहरण प्रकरणात जहूर मिस्त्री सहभागी होता. पाकिस्तानशिवाय भारतविरोधी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि इतर काही जणांचीही कॅनडात हत्या करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणात एकाही आरोपीला अटक झालेली नाही. निज्जर यांच्या हत्येप्रकरणी कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधही बिघडले आहेत.