भारतमातेच्या थोर सुपुत्राच्या प्रखर देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे

0
63

पिंपरी, दि. 12 (पीसीबी) : शहीद बाबू गेनू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि धाडसी वीर होते, ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत १२ डिसेंबर १९३० रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी ते रस्त्यावर उतरले, त्यात त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने ते शहीद झाले, अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राच्या प्रखर देशभक्तीचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहीद बाबू गेनू यांच्या शहीददिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कॉम्प्युटर ऑपरेटर दिलीप गुंड, मुख्य लिपिक विशाल जाधव, माया वाकडे, प्रशिक्षणार्थी ओंकार जाधव आदी उपस्थित होते.

थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ येथे झाला. ते स्वातंत्र्यपूर्व काळात नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्यास होते. भारतीय स्वातंत्र्य आणि देशभक्तीने प्रेरित झालेले बाबू गेनू हे स्वतः परदेशी मालाचा भारतात वापर होऊ नये यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यात ते शहीद झाल्याने देशभरात तेवत असलेली क्रांतीची ज्योत अधिक प्रज्वलित झाली. त्यांची प्रेरणा घेऊन हजारो देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले.