निगडी, दि. ७ (पीसीबी) –पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यांच्यावर पक्षाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. उलट त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून टाकले जात असून, या गुन्हेगारीवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडूनच अभय मिळत आहे. या प्रकारांमुळे शहरातील भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. या प्रकाराकडे पक्षश्रेष्ठींनी गांभिर्याने लक्ष घालावे व संबंधित गुन्हेगारी वृत्तीच्या प्रवृत्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवदेन निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
चोर सोडून सन्यास्याला फाशी, चोरांना मात्र अभय दिले जात आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची प्रतिमा अतिशय मलीन होत चालली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवकांवर फौजदारी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी तर होत आहेच. मात्र असे असतानाही त्यांच्यापैकी एकावरही पक्षाने अद्याप कारवाई केलेली नाही. परिणामी शहरातील पक्षाची प्रतिमा मलीन होत चालली आहे, असे काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.
तर शहरात लागू केलेली रेडझोनची हद्द कमी करून येथील भूमिपुत्राना न्याय मिळावा, रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी काळभोर यांनी वेळोवेळी मागणी केली. परंतु, काळभोर यांचीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. याच न्यायातून भाजपच्या गुन्हे दाखल असलेल्या पक्षाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर तसेच माजी नगरसेवकांवर तात्काळ कारवाई व्हावी, अशीही मागणी काळभोर यांनी केलेली आहे.