भाजप, शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठ

0
677

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार हे पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात आल्याने नागरिकांनी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, राजकारण बाजुला ठेऊन या शहराचे कर्तेधर्ते नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा प्रोटोकॉल म्हणून भाजपच तीनही आमदार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांनी उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते, पण त्यांनी चक्क पाठ फिरवली. आजवर पवार यांच्या अनुपस्थितीमुळे जी मनमानी सुरू होती तिला आता पायबंद बसणार आणि आपली सद्दी संपणार हे लक्षात आल्याने भाजप आणि शिंदे गटाचे आमदार- खासदार आले नाहीत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जाणीवपूर्वक महापालिकेत एक बैठक घेतली. निगडी पर्यंत मेट्रो, पवना जलवाहिनी, २४ तास पाणी पुरवठा, नवीन महापालिका भवन, कचऱ्या पासून वीज निर्मीतीसह अनेक कामांची त्यांनी माहिती घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शिवाय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, नाना काटे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषद सदस्या आमदार उमा खापरे, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या बैठककिकडे पाठ फिरवली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शहरात आले होते, अशा वेळी राजकीय मतभेद दूर ठेवून आमदार-खासदार यांची उपस्थिती अपेक्षित होती. त्याशिवाय सरकारमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र असताना आमदार-खसादार न आल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे एकट्याचेच महापालिकेत चालत होते. पोलिस आयुक्तालय आणि महापालिका भवनात ते सांगतील तिच कामे होत, असे चित्र होते. महापालिकेचे मोठ मोठे प्रकल्प झाले पण त्यात अन्य आमदार-खासदार किंवा दुसरे कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. गेल्या सव्वा वर्षांत प्रशासकीय कारभार सुरू असताना आमदार लांडगे यांनी त्यांच्या मनाप्रमाणे कामे करून घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलिस आयुक्त विनय चोबे हे फक्त आमदार लांडगे यांचेच एकत असतं, कारण दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच तसे आदेश होते, अशीही चर्चा आहे. त्याचाच अतिरेक झाल्याने अखेर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी थेट अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे केले. आता स्वतः अजित पवार यांनी जातीने लक्ष घातल्याने आमदार महेश लांडगे यांची सद्दी संपल्यात जमा आहे.

मावळचे शिंदे गट शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा मावळातूनच लढायचे आहे. भाजपच्या संमतीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, याच मतदारसंघात अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांचा २०१९ मध्ये खासदार बारणे यांनी सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला होता. आता अजितदादा त्या परभावाच्या वचपा काढण्याच्या मूडमध्ये आहेत. मावळ लोकसभासाठी भाजपने तयारी सुरू केलेली असतानाच राष्ट्रवादीचे सुनिल शेळके, माजी महापौर संजोग वाघेरे यांची नावे चर्चेत आहेत, मात्र अंतिम टप्प्यात पार्थ पवार हेच राष्ट्रवादीकडून इथे मैदानात उतरणार आहेत. खासदार बारणे यांचा आपल्याला स्पर्धकच नको म्हणून प्रयत्न आहेत, पण राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आग्रह पार्थ यांना उनमेदवारी द्यावी असा आहे. पुढील अडचण ओळखून खासदार बारणे यांनीसुध्दा अजित पवार यांना टाळले.

चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे अजित पवार यांची महापालिकेतील सत्ता गेली. त्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या आमदार झाल्या. आता चिंचवडच्या जागेवर श्रीमती जगताप यांचा पराभव करणारे नाना काटे पुन्हा तयारी करत आहेत. भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे अशी तगडी नावे राष्ट्रवादीकडे असून स्वतः अजित पवार चिंचवड विधानसभेसाठी आग्रही आहेत. आगामी काळात आपलाही पत्ता कट होणार हे ओळखून श्रीमती जगताप यांनीसुध्दा अजित पवार यांच्या स्वागताला जाणे टाळले.