भाजप शहराध्यक्षपदाची धुरा शत्रुघ्न काटे यांच्या खांद्यावर

0
3

पिंपरी, दि. १३ – पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी आज त्यासंदर्भातील घोषणा केली.
आगामी महापालिका निवडणुका विचारात घेता केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या सत्ताधारी भाजपचा शहराध्यक्ष कोण होणार याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. भाजप शहर समितीने त्यासाठी रितसर निवडणूक घेतली होती. निकाल प्रदेश भाजपमधून जाहीर होणार होता. काटे यांच्याशिवाय माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सरचिटणीस राजू दुर्गे आदी प्रमुख उमेदवार स्पर्धेत होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सर्व परिस्थितीती आणि जेष्ठांचे मत जाणून मतदान पाहून काटे यांचे नाव जाहीर केले.
महापालिकेत तीन टर्म नगरसेवक असलेले काटे हे भाजप चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. जगताप यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारस म्हणूनही काटे यांचे नाव चर्चेत होते. जगताप यांच्या हयातीत शहराचे महापौर किंवा महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठीही त्यांचे नाव स्पर्धेत होते. विधानसभा निवडणूक काळात काटे यांच्यासह १३ माजी नगरसेवकांनी उठाव केला आणि जगताप कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार द्यावा यासाठी उठाव केला होता. प्रसंगी बंडखोरीचा इशाराही दिला होता. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी मध्यस्थ केली आणि काटे यांनी शहर कार्यकारणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त कऱण्यात आले. आता त्यांना शहराध्यक्षपदावर नियुक्त कऱण्यात आले आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुका जिंकायच्या तर स्थानिक भुमिपूत्रांपैकीच भरभक्कम व्यक्ती असली पाहिजे, असा सूर होता. भाजप निष्ठावंतांपैकी अनेकांनी नामदेव ढाके यांच्या बाजुने कौल दिला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद असलेल्या या शहरात काटे यांना संधी देण्यामागे तोडिस तोड कार्यकर्ता म्हणून संधी दिली आहे. अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, उत्तम संघटक तसेच अभ्यासू कार्यकर्ता म्हणून काटे यांच्याकडे पाहिले जाते. आगामी काळात चिंचवड विधानसभेचे दोन मतदारसंघ होणार आहेत, त्यावेळी संभाव्य उमेदवार म्हणूनही भाजप त्यांच्याकडे पाहते.