भाजप विरोधात सर्व राजकीय पक्षांची महाविकासआघाडी

0
8

दि.२६(पीसीबी)-भाजप विरोधात सर्व राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आल आहेत. शिंदेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीचे घटकपक्षांच्या नेत्यांनी त्यासाठी बैठकांचा सपाटा लावला असून पहिल्या टप्प्यात दोन राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याची आणि पाठोपाठ महा महाविकास आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जागा वाटप करताना सर्वांनी मिळून सामोपचाराची भूमिका दाखविली असून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणारा म्हणजेच निवडूण येण्याची क्षमता असलेल्या नावांवर एकमत होत आहे. मतांचे विभाजन टाळले तर भाजपचा उमेदवार पराभूत होईल असे समिकरण सर्व प्रभागांतून समोर आले असून एकास एक उमेदवार देऊन यावेळी भाजपचा पाडाव करायचाच, अशी अटकळ सर्व नेत्यांनी बांधली आहे.

राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडी केवळ पक्षांतर्गत संवादापुरत्या मर्यादित नसून, त्यांचे थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख मुख्य नेते आझम पानसरे यांच्या मुलाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि त्यानंतर काही तासांतच रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट या घटनांनी भाजपच्या राजकीय गणितात अस्वस्थता निर्माण केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस ही पारंपरिकपणे प्रभावी शक्ती राहिली आहे. मात्र, पक्षफुटीनंतर या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपला मिळत असल्याचे चित्र गेल्या काही काळात दिसून आले. आता मात्र दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढण्याच्या पर्यायावर गंभीर चर्चा झाली. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी बैठकीतील सूर आणि अलीकडील घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आपली विस्कळीत ताकद पुन्हा एकवटण्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत स्पष्ट आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेत्यांना भाजपने पक्षात सामावून घेतले आहे ते सर्व निवृत्त होण्याच्या मार्गावरती होते. शहरातील मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भारतीय काँग्रेस या पक्षाचे एकत्रित ताकद आणि दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले, तर भाजपसाठी केवळ निवडणूक लढवणेच नव्हे, तर सत्ता टिकवणेही कठीण होऊ शकते. कारण भाजपची मोठी ताकद ही विरोधकांच्या विभागलेल्या मतांवर आधारित राहिली आहे. ती विभागणी संपल्यास थेट लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी होणार असून, त्याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आधीच अंतर्गत गटबाजी, आयात उमेदवारांचा वाद आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची एकजूट झाली, तर भाजपच्या अडचणी आणखी वाढू शकतात. त्यामुळेच राष्ट्रवादीतील या हालचालींकडे भाजप नेतृत्व बारकाईने लक्ष ठेवून आहे. भाजपच्या नाराजांपैकी अनेक मान्यवर विरोधकांच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याने भाजप नेत्यांचे धाबे धणानले आहेत.

येणाऱ्या एक-दोन दिवसांत जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत एकत्रित लढतीची घोषणा झाली, तर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही केवळ दोन नेत्यांची भेट नसून, भाजपच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.