भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार होणार गुरुजी

0
134

पुणे, दि. १२ (पीसीबी) : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी पुण्यात होत आहे. या मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. आजवर भाजपला ‘कमळाबाई’ असे हिणवणारे अजित पवार हे या मेळाव्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शाळा घेत मोलाचा उपदेश करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवार हे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत गुरुजींची भूमिका कशी वाटविणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. त्यानुसार पहिला महायुतीचा मेळावा येत्या रविवारी पुण्यामध्ये होत आहे. या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून अजित पवार हे असणार आहेत. या मेळाव्यामध्ये भाजपाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना आणि आरपीआयच्या आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. महायुतीमध्ये सामील होण्यापूर्वी अजित पवार हे कायम भाजपाला लक्ष्य करत आले आहेत. भाजपाचा ‘कमळाबाई’ असा उल्लेख करून ते भाजपची खिल्ली उडवत आले आहेत. आता अजित पवार हे भाजपविषयी कौतुकाचे बोल कसे बोलतात, याबाबत औत्स्युक्य असणार आहे.
जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असणार आहे. त्यामध्ये शिरूर आणि मावळ हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. पुण्याची जागा भाजपालाच जाण्याची शक्यता अधिक आहे. शिरूरमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत आतापासूनच स्पर्धा निर्माण झाली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. भाजपनेही ‘मिशन शिरूर’ पूर्वीपासूनच सुरू केले आहे. त्यामुळे भाजपचाही उमेदवार इच्छुक असणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याशिवाय राष्ट्रवादी आणि भाजपमध्येही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. बारणे यांच्या उमेदवारीला महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हा विरोध कसा रोखायचा, यावर अजित पवार हे मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा मतदार निवडणुकीमध्ये पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वडगाव शेरी आणि हडपसर हे मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. वडगाव शेरी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांना पराभूत केले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपकडून उमेदवारीसाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे. या पेचातून मार्ग कसा काढायचा आणि संभाव्य बंडखोरी कशी रोखायची, हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार हे महायुतीच्या मेळाव्यामध्ये सल्ला देण्याची शक्यता आहे.