भाजप महाराष्ट्रात स्वबळावर जिंकू शकत नाही…देवेंद्र फडणवीसांच खळबळजनक वक्तव्य

0
69

मुंबई, दि. 28 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांची तारीख घोषित होताच प्रचाराला धूमधडाक्यात सुरूवात झाली असून जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. एवढंच नव्हे तर प्रचारादरम्यान अनेक दावेही केले जात आहेत. मात्र याचदरम्यान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही, असे विधान त्यांनी नुकतंच केलं. मात्र निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही, मात्र या निवडणुकीनंतर आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ. आमच्याकडे सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे हे खरं आहे.एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केलं. ‘ खरं काय आहे, नेमकी परिस्थिती काय आहे, याबद्दल आपण व्यावहारिक असलं पाहिजे. ज्यांना या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही त्या नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी याबद्दलही फडणवीस बोलले. आमच्या पक्षातील काही महत्वाकांक्षी नेत्यांना यावेळी तिकीट मिळू शकलं नाही, उमेदवारी देता आली नाही, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं’, असंही ते म्हणाले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 288 जागांपैकी 121 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटने 49 उमेदवार उभे केले असून त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजप, शिवसेना- शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे महायुतीचे सरकार स्थापन होईल असा दावा फडणवीस यांनी केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील 48 पैकी केवळ 17 जागा जिंकता आल्या, पण विधानसभा निवडणुकीत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.