भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच बंडखोर उमेदवारांना बळ दिले

0
2

दि.१३(पीसीबी)-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. कोकणातही राणेंच्या नेतृत्वात भाजपने विजय खेचून आणला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्षांच्या विजयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून यातून भाजपमधील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा हल्लाबोल नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांवेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रवींद्र चव्हाण यांनी मेहुणे विनोद राऊळ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांविरोधातच अपक्षांना बळ देत निवडून आणल्याचा आरोप भाजपमधील एका गटाकडून केला जाऊ लागला आहे.

तळकोकणात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा बोलबाला राहिला होता. राणेंच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजय मिळाला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपचे खासदार नारायण राणे , मंत्री नितेश राणे व आमदार नीलेश राणे यांचा करिष्मा पाहायला मिळाला. पण या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार निवडून आल्याने राणेंच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद गटात काही अपक्ष निवडून आल्याने मंत्री नितेश राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले. या अपक्षांच्या विजयामागे अदृश्य शक्तीचा हात असून छातीवर कमळ लावून काही नेते कमळ चिन्हाच्याच उमेदवारांना पाडण्यासाठी ताकद लावतात, अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी निकालाच्या दिवशीच आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राणेसमर्थक उमेदवारांनीही थेट नाव घेत आरोप केले आहेत.

या निवडणुकीत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा पराभव करून सावंतवाडी तालुक्यात कोलगाव जिल्हा परिषद गटातून मायकेल डिसूजा हे अपक्ष म्हणून निवडून आले. या विजयाचे श्रेय आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण यांना देणार, अशी प्रतिक्रिया मायकेल डिसूझा यांनी विजयानंतर दिल्याने आश्चर्य व्यक्त झाले. इतकंच नाही तर रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ यांनी विजयाच्या घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तर मायकेल डिसूजा यांच्या विजयानंतरच्या बॅनरवर रवींद्र चव्हाण यांचे फोटो झळकल्याने उलट सुलट राजकीय चर्चा रंगली होती. मात्र हे बॅनर आता काढण्यात आले आहेत. हे बॅनर आपण नाही तर आपल्या कार्यकर्त्यांनी लावले होते, असं स्पष्टीकरण मायकल डिसूजा यांनी दिलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अपक्ष उमेदवारांना अदृश्य शक्तीच्या हातांनी पुरवलेली रसद, याची चर्चा रंगली आहे.