भाजप नेत्याने महिला आमदाराला सुनावले, “तुम्ही परत आमदार होणार नाहीत”, नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम

0
43

बीड, दि. २८ -(पीसीबी) : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकीय नेत्यांचे क्लेष वाढत चालल्याचं दिसून येत आहे. कारण महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) असे मिळून प्रत्येकी तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत युतीमुळे एकाच उमेदवाराला तिकीट मिळणार असल्याने सर्वच राजकीय नेतेमंडळी स्वतःचं तिकीट निश्चित करण्यासाठी ठोस पाऊल उचलत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदार संघातील भाजपची स्थिती देखील बिकट झाल्याचं चित्र दिसत आहे. कारण आ. मोनिका राजळें यांच्या विरोधात भाजप पक्षामधीलच नेते एकवटल्याच दिसून येत आहे. कारण आता लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते देखील प्रचंड प्रमाणात त्रस्त झाले आहेत.

सध्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम सुरू आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदारसंघातून आवाज उठवला असून आता त्यामध्ये बदल केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी दिला आहे.

पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आपल्या भावना स्पष्टपणे बोलून दाखवल्या आहेत. जनतेसाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे उद्योग मतदारसंघातील मोठं मोठे प्रस्थापित नेते करत आहेत. कारण नात्यागोत्याच्या राजकारणामुळेच मतदारसंघ बुडवण्याचे काम सध्या सुरू असून लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरू असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.