भाजप नेत्याच्या घरी छापा, बेहिशेबी संपत्ती शोधायला गेले पण… दृष्यं दिसताच आयकर अधिकाऱ्यांना घाम फुटला

0
13

दि. 9 (पीसीबी) – भाजप नेत्याच्या घरी छापे टाकायला गेलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. बेहिशेबी संपत्ती शोधायला गेलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे, कारण या भाजप नेत्याच्या घरामध्ये अधिकाऱ्यांना मगरी सापडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भाजपच्या माजी आमदाराच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या.

मध्य प्रदेशातल्या बंडा विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार हरवंशसिंह राठोड आणि बीडी कन्स्ट्रक्शन व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या. राठोड यांच्यावरची कारवाई पूर्ण झाली असून, केशरवानी यांच्यावरच्या धाडीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या कारवाईमध्ये टीमला आश्चर्यकारक बाबी सापडल्या आहेत.

आयकर विभागाच्या टीमने दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमधून कोट्यवधी रुपयांची करचोरी पकडली आहे. तसंच, तपासात दोनशे कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचाही छडा या टीमला लागला आहे. या टीमला तपासावेळी 14 किलो सोनं आणि तीन कोटी 80 लाख रुपये मिळाले. या दोघांनी 150 कोटी रुपयांची करचोरी केली असल्याचं टीमच्या लक्षात आलं. भाजपचे माजी आमदार हरवंशसिंह राठोड यांच्या घरी आयकर विभागाच्या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचं घबाड सापडलं आहे. बिडी व्यावसायिक राजेश केशरवानीच्या ठिकाणांवरून सात कार्सदेखील टीमला मिळाल्या आहेत.

सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माजी आमदार राठोड यांच्या घरात एक तलाव असल्याचं आयकर टीमच्या लक्षात आलं. त्या तलावाची पाहणी केली असता, त्यात तीन छोट्या मगरी असल्याचं दिसून आलं. मगरी पाळणं कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आयकर विभागाने याची माहिती वनविभागाला कळवली आहे.

या मगरी नेमक्या कशासाठी पाळण्यात आल्या होत्या, यावर सवाल उपस्थित केले जात आहेत. माजी आमदार बिडी व्यावसायिकदेखील आहेत. या दोघांनी अन्य कुठे गुंतवणूक केली आहे, करचोरी कुठे केली आहे, याचा तपास करण्यासाठी दस्तऐवजांची तपासणी केली जात आहे. हरवंश राठोड यांचे वडील हरनामसिंह हे उमा भारती यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते.

करचोरी, बेहिशेबी मालमत्ता यांबरोबरच या प्रकरणात मगरीही सापडल्या असल्याने प्रकरणाची अधिक चर्चा होत आहे.