– नविन पुलावरून पाच किलोमीटर खडकीला वळसा हे बोपखेलवासियांवर आयुष्यभरासाठी अनावश्यक दुखणे लादले गेल्याची माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांची टीका
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपुर्वीपासून पिंपरीला येण्यासाठी सीएमई हद्दीतून बोपखेलवासियांसाठी दापोडी मार्गे जुना रस्ता होता. मात्र केंद्रांत सत्तेत आल्यानंतर भाजपच्या संरक्षण मंत्र्यांनी हा जूना रस्ता कायमचा बंद केला. बोपखेल पाकिस्तानमध्ये असल्यासारखी अत्यंत हिन वागणूक बोपखेलच्या नागरिकांना देण्यात आली. हा रस्ता बंद केल्यामुळे नविन पुलावरून पाच किलोमीटर खडकीला वळसा घालून आता नागरिकांना दापोडी, पिंपरीला यावे लागणार आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाच्या हातात सत्ता असताना हा प्रश्न त्यांना सोडविता आला नाही, ही त्यांची नामुष्की आहे. केवळ भाजपच्या करंटेपणामुळेच बोपखेलवासियांवर आयुष्यभरासाठी हे अनावश्यक दुखणे लादले गेल्याचा आरोप माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी केला आहे.
बोपखेल येथे उभारण्यात आलेल्या पुलाचा पाहणी दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार हे करणार आहेत. त्याबाबत भाजपच्या माजी नगरसेवकाने पत्रक काढून टीका करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. याबाबत वाळके यांनी एक पत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून बोपखेलच्या नागरिकांना दापोडीकडे येण्यासाठी थेट रस्ता होता. हा रस्ता केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर बंद करण्यात आला. वर्षानुवर्षे सुरू असलेला हा रस्ता बंद केल्यामुळे बोपखेलवासियांवर भाजपने अन्याय केला.
केंद्रात सलग आठ वर्षे सत्ता असताना आणि भाजपाचा संरक्षणमंत्री असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांना रस्त्याचा प्रश्न सोडविता आला नाही. एकाही स्थानिक नेत्याने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. रस्त्याचा प्रश्न सोडवू न शकलेले भाजपनेते नव्याने उभारलेल्या पुलाचे श्रेय लाटत आहेत, हे शहरवासियांचे दुर्देव असल्याचेही वाळके म्हणाले.
वस्तुत: या पुलामुळे बोपखेलवासियांना नाहक त्रास होणार आहे. पिंपरीकडे येण्यासाठी येथील नागरिकांना या पुलाचा वापर करून खडकी जावे लागणार आहे. व त्यानंतर खडकीला वळसा घालून पिंपरीकडे यावे लागणार आहे. हे आयुष्यभराचे अनावश्यक दुखणे भाजपमुळेच लादले गेले आहे. गेल्या पाच वर्षांत एकही आश्वासन पूर्ण न करणार्या भाजपच्या पदाधिकार्यांनी महापालिकेत केवळ टक्केवारी, भ्रष्टाचार केला. शहरवासियांवर पाणीटंचाई लादणारे यांचे पदाधिकारी लाचखोरी, खंडणीखोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये गेले ही वस्तुस्थिती येथील जनता विसरली नसून बोपखेलच्या नागरिकांवर अन्याय करणार्या भाजप नेत्यांना येथील जनता येत्या महापालिका निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही वाळके यांनी व्यक्त केला आहे.
हिंम्मत असेल तर रस्त्याचा सोडवा –
भाजप नेत्यांच्या करंटेपणामुळे बोपखेल ते दापोडी हा रस्ता बंद करण्यात आल्याने बोपखेलच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलामुळे नागरिकांची सोय नव्हे तर अडचणच झाली आहे. भाजप नेत्यांमध्ये हिंम्मत असेल तर त्यांनी बोपखेल दापोडी रस्त्याचा प्रश्न सोडवून दाखवावा, असे आव्हानच चंद्रकांत वाळके यांनी दिले आहे. केंद्रात भाजपची सत्ता असून संरक्षणमंत्रीही याच पक्षाचा असल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी जुन्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.