भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

0
236

मुंबई : एकनाथ शिंदे  आणि भाजप यांनी एकत्रित येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेनंतर आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली  गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांनाच एक प्रकारे डिवचलं आहे.

मुख्यमंत्री आणि सोमय्यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाहेर आल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत जो संघर्ष होता, महाराष्ट्राला माफिया मुक्त करण्याचा… तो एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केला. त्यासाठी राज्यातील जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले आणि अभिनंदन केलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री कार्यालयात पाहून आनंद झाला.

मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, आमचा संघर्ष सुरू आहे त्यात काही ठिकाणी प्रक्रिया अडकली आहे. अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट… सर्वांना पर्यावरण प्रेमी म्हणाऱ्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी रिसॉर्टवरील कारवाई थांबवली आहे. तो अनधिकृतपणे बांधण्यात आलेला रिसॉर्ट पाडलाच पाहिजे आणि मला विश्वास आहे की, तो रिसॉर्ट पाडलाच जाणार असंही सोमय्या म्हणाले.

सरनाईक, यामिनी जाधवांवरील ईडीची पीडा टळणार?
किरीट सोमय्या हे गेल्या अनेक दिवसांपासून मविआतील नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप करत आहेत. त्यात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, आता हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर सोमय्या यांनी म्हटलं, गेले काही दिवस आमचे मित्र संजय राऊत वॉशिंग मशिनची गोष्ट करत आहेत. राज्यातील जनतेने बिनपाण्यानेच आता धुलाई केली आहे. संजय राऊत यांनी 15 पानांचं पत्र लिहिलं होतं पंतप्रधानांना.. किरीट सोमय्या आणि ईडीच्या चार अधिकाऱ्यांबाबत. त्या पत्रावर ठाकरे सरकारच्या एसआयटीनेच सांगितलं होतं की, या आरोपात काही दम नाही, सर्व बोगस आहे. जे घोटाळे सोमय्याने बाहेर काढले आहेत त्यातील कुठलीही तक्रार सोमय्या मागे घेत नाही आणि घेणारही नाही. काही गोष्टी न्यायालयात गेले आहेत, न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.