भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्याकडून लेटरहेडचा गैरवापर

0
3

– राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती जाधव यांची आयुक्तांकडे लेखी तक्रार

पिंपरी, दि. ११ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी अधिकृत पदावर नसतानाही ‘सभापती, फ क्षेत्रीय समिती’ या पदाच्या लेटरहेडचा वापर करून शासनाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर गैरप्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली असून गायकवाड यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी ३० मार्च २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना मालमत्ता कराच्या ‘अभय योजनेला’ मुदतवाढ देण्याबाबत एक निवेदन दिले होते. या निवेदनासाठी त्यांनी जे लेटरहेड वापरले, त्यावर त्यांनी स्वतःचा उल्लेख “सभापती : ‘फ’ क्षेत्रीय समिती” असा केला आहे. मात्र, माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुंदन गायकवाड हे सध्या ‘फ’ क्षेत्रीय समितीचे सभापती नाहीत. अधिकृत मान्यता नसतानाही अशा प्रकारे पदनामाचा वापर करणे हे प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करणारे आणि महानगरपालिका कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचे तक्रारदार मारुती जाधव यांनी नमूद केले आहे.

मारुती जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकृत पदाचा चुकीचा प्रतिपादन करून कुंदन गायकवाड यांनी सार्वजनिक विश्वासाला तडा दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. कुंदन गायकवाड यांनी अशा प्रकारचे लेटरहेड अजून किती ठिकाणी वापरले याची चौकशी व्हावी. पदाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र किंवा निलंबित करण्याची कारवाई करावी. निवडणूक, कायदे आणि महानगरपालिका नियमांनुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर पाऊले उचलली जावीत.

या तक्रार निवेदनाची दखल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका आयुक्त कार्यालयाने घेतली असून, त्यावर ७ एप्रिल २०२६ रोजी आवक-जावक विभागाची मोहोर उमटवण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन आता कुंदन गायकवाड यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.