भाजप दुतोंडी गांडुळासारखा;संजय राऊतांचा हल्लाबोल

0
5


जरांगे पाटील यांच्याबाबतीत भाजप नेत्यांची भाषा हीन दर्जाची होती. ती भाषा एकदा पंतप्रधान मोदींनी ऐकावी, मोदी रडतायत की आईला शिव्या दिल्या म्हणून. इथं जरांगे आणि मराठा आंदोलकांबाबत त्यांचे नेते कोणती भाषा वापरत होते, तेही ऐकावं त्यांनी, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला.मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भाजपचे पडद्यामागचे म्हणणे वेगळे आहे. भाजप दुतोंडी गांडुळासारखा आहे. ते अजूनही जरांगे यांची कुचेष्टाच करतात.भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते यांनी ज्याप्रकारे जरांगेंविषयी भाषा वापरली ती समर्थनीय नाही. नंतर लगेच श्रेय घ्यायला येतायत. नक्की तुम्ही कोण व भूमिका काय? अशी विचारणा त्यांनी केली.

ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांचे मुंबईत मोठे आंदोलन झाले. काल सरकारने मागण्या मान्य केल्या, जर जरांगे व आंदोलक समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. नवी मुंबईतही त्यांनी गुलाल उधळला होता. आता मुंबईतील गुलालात व नवी मुंबईच्या गुलालात काय फरक आहे ते बघावं लागेल. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो. भुजबळांनी घेतलेल्या भुमिकेवर राऊत यांनी सांगितले की, भुजबळांचे मत बरोबर आहे. जोपर्यंत काही समोर येत नाही तोवर आकांडतांडव करू नये. बाळासाहेबांनी सांगितल्यानुसार मराठी माणसाची एकजूट कायम राहिली पाहिजे. मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठी बांधव मुंबईत आले. मुंबई तुमचीच आहे हे सांगितले. त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात शिवसैनिक व मनसैनिकांनी चांगले काम केले.

दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, कालच्या प्रसंगात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? एकनाथ शिंदे गुलाल उधळायला नवी मुंबईत होते, पण काल ते दिसले नाहीत. याचे कारण काय? अशी विचारणाही राऊत यांनी केली. मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राहणं गरजेचे होते. कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ते या चर्चेत होते, सूचना देत होते, पण अजित पवार व एकनाथ शिंदे कुठे होते. ते आनंद सोहळ्यात का नव्हते. हे प्रकरण चिघळत राहावे आणि मुख्यमंत्री अडचणीत यावेत म्हणून काही करत होते का, हे काल प्रकर्षाने जाणवले. उपोषण नक्की संपले पण आंदोलन संपलेले नाही. अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्यापुढं दुसरा पर्याय नव्हता. हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना निर्णय घ्यावा लागला.