तुषार हिंगेंच्या राजीनाम्यानंतर संतोष तापकीर यांचा आत्मदहनाचा इशारा
दि. २९(पीसीबी) – आगामी महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी जाहीर केलेल्या भाजपच्या नूतन कार्यकारणीवर तीव्र नाराजीचे सावट आहे. माजी उमहापौर तुषार हिंगे यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा देत फक्त आमदारांच्या पुढे मागे कऱणाऱ्यांनाच संधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुसरीकडे दोन पिढ्यांपासून सलग ४० वर्षे भाजपशी एकनिष्ठ असलेल्या भोसरी मतदारसंघातील चऱ्होलीचे संतोष तापकीर यांनी सोमवारी थेट पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, कार्यकारणीत आमदार महेश लांडगे समर्थकांचा आणि आमदार शंकर जगताप यांच्या विरोधकांचाच भरणा असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष काटे यांनी ३०० कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन गणेश चतुर्थिचा मुहूर्त साधत रखडलेली जंबो कार्यकारणी सोशल मीडियातून जाहीर केली. ४ सरचिटणी, ८ उपाध्यक्ष, ८ सचिव, १ कोषाध्यक्ष आणि १०० वर सदस्य मिळून १२६ जणांची जंबो कार्यकारणी केली. वारंवार तेच ते चेहरे देण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना आणि निष्ठावंतांना संधी देण्यात आली. सर्वसमावेशक नावे देण्याचा प्रयत्न झाला. सत्तासमतोल आणि आमदारांच्या समर्थकांचाही विचार केला गेला, असे काटे यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्षात नवीन कार्यकारणीच्या बातम्या झळकताच असंतोष उफाळून आला. कार्यकारणी ठरविताना शहरात ४ आमदार असताना फक्त एका आमदाराच्या सांगण्यावरून नावे निश्चित करण्यात आली, कुठलेही निकष न लावता ठराविक कार्यकर्त्यांनाच चांगली पदे देण्यात आली, असा आरोप करण्यात आला. असंतोष शमला नाही तर मोठा स्फोट होऊ शकतो, अशीही चर्चा रंगली.
मोरवाडी, शाहुनगर, मासुळकर कॉलनी परिसरात मोठा दबदबा असलेले माजी उपमाहापौर तुषार हिंगे यांनी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याशी बराचवेळ हुज्जत घातली आणि नाराजी प्रकट केली. उपमहापौर असताना टर्म संपण्यापूर्वी मध्येच राजीनामा द्यायला लावला. नंतर शहर युवक अध्यक्ष असताना राज तापकिर यांच्यासाठी राजीनामा घेतला. आतासुध्दा अन्याय केला. अशा प्रकारे आपल्याला गृहीत धरू नका, असा इशारा त्यांनी दिला. माझ्या प्रमाणे अनेकजणांची खदखद आहे असा इशाराही हिंगे यांनी दिला.
दरम्यान, संतोष तापकीर यांच्या पत्राने खळबळ उडाली. तापकीर म्हणतात, गेल्या ३० वर्षांपासून भाजपमध्य काम करतो आहेत पण आजवर फक्त आश्वासनांवर बोळवण केली. २०१४ पासून केंद्रात, राज्यात सत्ता आहे आणि नंतर महापालिकेतही सत्ता होती. एकनिष्ठ राहिलो मात्र, कायम वंचित ठेवले गेले. संघटनेत खच्चीकरण होत असल्याने नाराजी वाढली असून आता संघटनेवरचा विश्वास उडाला आहे. योग्य विचार केला नाही तर येत्या दोन दिवसांत पक्षकार्यालयाचे समोर आत्मदन करणार आहे.
सचिन काळभोर यांचाही आरोप –
निगडी येथील कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पत्रक काढून गंभीर आरोप केले आहेत. सचिन काळभोर हे पूर्वी भाजप पिंपरी चिटणीस पदावर कार्यरत होते आणि त्यांची ओळख एक आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. त्यांनी अनेकदा शहरातील नागरी समस्यांवर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. काळभोर हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. याउलट, त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी ठोस भूमिका घेतली होती.
दोन आमदारांचे गटतट
आमदार शंकर जगताप हे आमदार होण्यापूर्वी शहराध्यक्ष होते. भोसरीतील आमदार लांडगे यांच्या समर्थकांवर त्यावेळी अन्याय झाल्याची भावना होती. आताचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी जगताप यांना आमदारकीसाठी उमेदवारी देऊ नये म्हणून चिंचवड मतदारसंघात उठाव केला होता. काही नगरसेवकांच्या मदतीने त्यांनी दबाव आणला होता. विधानसभा निवडणुकित जगताप हे लाखावर फरकाने जिंकले. नूतन अध्यक्ष काटे झाले पण त्यांनी जगताप यांच्या समर्थकांना वेचून वेचून बाजुला केला आणि आमदार लांडगे यांना झुकते माप दिले. आता महापालिका निवडणुकितही उमेदवारी देताना काटे हे मागचे उट्टे काढतील आणि आपल्याला डावलतील, अशी भिती आमदार जगताप समर्थकांना आहे. भाजप पक्षातील दोन आमदारांच्या गटबाजीची छाया शत्रुघ्न काटे यांच्या कार्यकारणीवर पडल्याने निष्ठावंत गटातील चिंता वाढली आहे.