भाजप कदापि सोडणार नाही – आमदार अश्विनी जगताप

0
93

संदिप कस्पटे, राम वाकडकर यांच्या राजीनाम्याची प्रदेशाकडून गंभीर दखल

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) : मी भाजप कदापि सोडणार नाही. उमेदवारी मिळो न मिळो मी भाजपचाच प्रचार कऱणार, कारण भाऊंचा (दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप) तो विचार आहे, अशा शब्दांत चिंचवड भाजपच्या आमदार अश्विनीताई जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझी तब्बेत ठिक नसल्याने मी घरीच आहे, कोणत्याही बड्या नेत्यांला (शरद पवार) भेटण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी आपण भाजप सोडत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याने पक्षात अस्वस्थता आहे. पाठोपाठ वाकड भागातील पक्षाचे एक मोठे प्रस्थ राम वाक़डकर यांनीही भाजपला रामराम करत असल्याचे पत्र पाठविल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली. दोन्ही नेत्यांनी आपल्या पत्रात पक्षाचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांच्यावर निशाना साधला आणि आणखी १५ माजी नगरसेवक आमच्या मागोमाग राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला.

उमेदवारीवरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे वातावरण असताना मधेच भाजपमध्ये भूकंप होणार, आमदार अश्विनीताई जगताप या २० नगरसेवकांसह तुतारी हातात घेणार, अशी एक बातमी शहरातील न्यूज पोर्टलवर (पीसीबी नव्हे) छापून आली. आमदार जगताप यांच्याकडे त्याबाबत कार्यकर्ते आणि नेत्यांकडून विचारणा होऊ लागली. शंकर जगताप यांच्या संभाव्य उमेदवारीवर ही प्रतिक्रीया असल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात आमदार अश्विनीताई यांनी स्वतः फोन करून याबाबतचे आपले मत पीसीबी टुडे प्रतिनिधीकडे सांगितले.

आमदार अश्विनीताई म्हणाल्या, मी पक्ष सोडणार, तुतारी हातात घेणार, अशी अत्यंत चुकिची व खोटी बातमी कोणीतरी छापली आहे. असे काहीही नाही. भाऊंचे आणि भाजपचे एक वेगळेच नाते होते. आमदार म्हणून मला काम कऱण्याची संधी मिळाली. विधानसभेला उमेदवारी मिळो अथवा न मिळो जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्यांचाच प्रचार मी कऱणार आहे. भाजप विरोधात उगाच कोणी खोडसाळपणे काही बातम्या देऊन नको तो विचार रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याने मला वाईट वाटले.

बावनकुळे यांचा कस्पटेंना फोन –
भाजपमधील असंतोष उफाळून आला आणि संदीप कस्पटे यांनी नाराज होत पक्षाला रामराम ठोकल्याच्या बातम्या सर्वत्र आल्या. पाठोपाठ राम वाकडकर यांनीही मंगळवारी पक्ष सोडत असल्याचे पत्र दिले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. कस्पटे यांना फोन करून मी तुमचा राजीनामा स्विकारलेला नाही, २३ किंवा २४ ला आपण त्यावर बोलू, असे म्हणत समजूत घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
दरम्यान, राम वाकडकर यांच्याशी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री फोनवर संपर्क साधला. काही निर्णय घेऊ नका, दोन दिवसांत आपण सविस्तर बोलू असे सांगित त्यांनी वाक़डकर यांना समजावले.