भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा बुधवारी रोड-शो, जाहीर सभा

0
366

चिंचवड, दि. 21 (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (बुधवारी) रोड-शो होणार आहे. तसेच सायंकाळी जाहीर सभा देखील होईल, अशी माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

या रोड-शोमध्ये उमेदवार अश्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्यासह शिवसेना-भाजपचे आदी नेते, पदाधिकारी सहभागी असणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता वाकड येथून मुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड-शो ला सुरुवात होईल. उत्कर्ष चौक दत्तमंदिर जवळ वाकड – वाकड रोड – डांगे चौक – दत्तनगर जुना जकात नाका -चापेकर चौक –एल्प्रो मॉल – पॉवर हाउस चौक – केशवनगर – एम एम हायस्कूल काळेवाडी – कुणाल हॉटेल – नखाते ऑफिस – विमल गार्डन समोरून – शिवेंद्र लॉन्स असा रोड-शो चा मार्ग असणार आहे. ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाणार आहे. रहाटणी, तापकीर मळा येथील शिवेंद्र लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होईल.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावल्याबाबत थेरगावातील जनतेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या साडेबारा टक्के परताव्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने चिंचवडचा जुना जकात नाका येथे नागरिक मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत करणार आहेत. सभेत विविध संघटना भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना पाठिंबा देणार आहेत.

राज्याचे कर्तव्यदक्ष, जनतेसाठी अहोरात्र झटणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड-शो आणि सभेला शिवसेना-भाजप-मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.