भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, लवकरच घोषणा

0
95

मुंबई, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आता लवकरच भाजपची पहिली उमेदवारी यादी समोर येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप हायकमांडच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. ही यादी 30 ते 35 उमेदवारांची असेल असं बोललं जात आहे. निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून राज्यातील पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, असे बोललं जात आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरु करता येईल का, याची चाचपणी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरु केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, नवीन सरकारची स्थापना ही 10 ऑक्टोबर 2024 पूर्वी करता येईल का, याची सुद्धा चाचपणी केली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यापूर्वी हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 23 दिवसांच्या अंतराने संपते. त्यामुळे दोन्ही विधानसभांची नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्हीही राज्यांच्या विधानसभा निवडणूक या 2009 पासून एकत्र होत आहेत.त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली, तर महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी पूर्ण होईल. तर हरियाणाची विधानसभा निवडणूक प्रक्रिया 20 दिवस आधीच पूर्ण होणार आहे.