भाजप उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारपर्यंत

0
3

मुंबई, दि. 23 (पीसीबी) : नाराजीनाट्यामुळे महायुतीचे जागावाटप रखडले असून भाजप उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने जाहीर केलेल्या काही उमेदवारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे उर्वरित जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी शिंदे, फडणवीस व पवार हे पुन्हा भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. जागावाटपात अपेक्षेनुसार जागा मिळत नसल्याने अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सायंकाळी नवी दिल्लीला रवाना झाले. जागावाटपात तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

भाजप १६० हून अधिक जागा लढविण्यावर ठाम असून शिंदे गटाला ७५-८० आणि अजित पवार गटाला ४५-५० जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव शिंदे व पवार यांना अमान्य असून २५-३० जागांवर वाद कायम आहे. मनसेबरोबर भाजपचा ‘समझोता’ झाल्याने महायुतीला काही जागांवर उमेदवार देता येणार नाही.

भाजपमध्येही बंडखोरी
पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी व नाराजीनाट्य सुरू आहे. कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मंत्री राज पुरोहित नाराज आहेत. नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक नेते नाराज असून उमेदवार बदलण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली असून त्यांना सहकार्य करण्यासाठी भाजप किंवा शिंदे गट उमेदवार न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. गणेश नाईक यांना ऐरोलीतून व मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पण नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक हे बेलापूरमधून लढण्यास इच्छुक होते व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. अमरावतीसह विदर्भात काही ठिकाणी आणि नाशिक, कोल्हापूर, सांगलीतही वेगवेगळ्या कारणांवरून नाराजीनाट्य सुरू आहे. फडणवीस हे या सर्व नेत्यांशी चर्चा करीत असून वेगवेगळी आश्वासने देवून वाद मिटविण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रमुख नेते दिल्लीत
मुंबईत जागावाटपाबाबत तोडगा निघत नसल्याने शिंदे-फडणवीस हेही दिल्लीला जाऊन शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले जागावाटप अंतिम न झाल्याने शिंदे व पवार यांनी आपली उमेदवार यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. काही उमेदवारांना पक्षाच्या ए व बी अर्जांचे वाटप केले आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे-पवार गटाला मागणीनुसार जागा दिल्याने विधानसभेसाठी काही जागांवर तडजोड करावी, अशी भाजपची भूमिका आहे. भाजपने किमान १२० जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने किमान १६० जागा लढवाव्यात, असा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही जागावाटपाचा तिढा कायम आहे.