भाजप आमदार गौतमी पाटील बरोबर बेभान होऊन नाचला

0
106

पुणे, दि. ४ (पीसीबी)
भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांचा नर्तकी गौतमी पाटीलसोबत नाचतानाचा व्हिडिओ शेअर करत हा इशारा दिला आहे. भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे.

झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे.